नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्याकडून सुतारदरा परिसरातील पावसाळा पूर्व तयारीचा प्रत्यक्ष आढावा

पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागू नये, तसेच परिसरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्याकडून पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत कोथरूड भागातील सुतारदरा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी कोथरुड क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता किशोर ढाकणे यांच्यासमवेत पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्या, जलनिस्सारण वाहिन्यांची स्थिती, रस्त्यांवरील अडथळे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी बोलताना नगरसेवक हर्षवर्धन मानकर म्हणाले,पाहणीदरम्यान संभाव्य समस्या ओळखून त्यावर कायमस्वरूपी व परिणामकारक उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड न करता, प्रभागातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा व प्रत्यक्ष स्तरावर काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. असेही मानकर म्हणाले



