पुण्यात पाण्यावरून राजकारण तापले, भाजपकडून प्रशासनाची पाठराखण तर राष्ट्रवादी कडून आंदोलन, एक महिन्यानंतरही समस्या सोडवण्यात अपयश

पुणे – भामा आसखेड प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा होईपर्यंत यावर अवलंबून असणाऱ्या भागात दिवसभर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करू नये, अशा सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. शहराच्या पूर्व भागातील दूषित पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्ये संदर्भात महापालिका आयुक्तांनी भामा आसखेड प्रकल्प जलशुद्धीकरण केंद्राला स्थानिक लोकप्रतिनिधींसह नुकतीच भेट दिली.

यावेळी नगरसेविका अश्विनी भंडारे, संगीता दांगट, नंदिनी धेंडे, शीतल सावंत, नगरसेवक अनिल टिंगरे, रवी उर्फ हर्षल टिंगरे, सुहास टिंगरे, अनिल सातव, रामदास दाभाडे यांच्या सह माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक राहुल भंडारे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुणे शहराच्या उत्तर पूर्व भागातील गढूळ आणि पिवळसर तसेच अपुऱ्या कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाणी कशाप्रकारे शुद्ध केले जाते याचा प्रत्यक्ष आढावा त्यांनी यावेळी घेतला. तज्ञांच्या मदतीने गढूळ पिवळसर पाण्याच्या तक्रारीचे पुढील दोन दिवसात निराकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी यावेळी दिले. तज्ञांच्या पाहणीनंतर व त्यांच्या निष्कर्षानंतर यावर उपाययोजना होईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट करण्यात आलं. भामा आसखेड प्रकल्पाच्या वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने MSEDCL विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याबाबत देखील महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले आहेत.



पुणे महापालिकेत पाण्याचे राजकारण
एकंदरीतच या गंभीर समस्येला महिना उलटला तरी महापालिका प्रशासनाला यावर उपाययोजना करता आली नाही. प्रभाग दोनच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कार्यालयावर आंदोलन करून उपाययोजना करण्याची मागणी केली. तर सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाच्या चुकांची पाठराखण करत सोयीच्या भूमिका घेत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांनी देखील दोन वेळा भामा आसखेड प्रकल्पाला भेट दिली. एकंदरीतच पाण्याच्या या गंभीर समस्येबाबत सत्ताधारी भाजप व सत्तेत असूनही प्रशासनावर पकड नसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुटप्पीपणा या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. सत्तेत असणारा भाजप पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात ठरत असून महापौरांनी आदेश देऊन देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात येते. तर भाजपसोबत राज्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महापालिकेत प्रशासनावर स्वतःची पकड निर्माण करता न आल्यामुळे आता पक्षावर आंदोलनाची वेळ आली आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजप आणि राष्ट्रवादी यामधील धूसफूस या निमित्ताने पुन्हा एकदा पुणेकरांना दिसून येत आहे.



बापू पठारेंना स्पष्ट भूमिकाच घेता येईना
विद्यमान आमदार बापू पठारे यांच्या घरात मुलगा आणि सून हे भाजपचे नगरसेवक असल्यामुळे मतदारसंघात काम करताना त्यांनाही स्पष्ट भूमिका घेता येत नसल्याचे दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या महापालिका आयुक्त तरी किती गांभीर्याने सोडवतात हे पाहणे आता गरजेचे आहे.









