लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ युवकांनी अवश्य वाचावे ; आयुष्यात योग्य दिशा मिळेल – अमित शाह

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अमित शाह यांच्या हस्ते यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात युवकांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे वाचन करण्याचे आवाहन केले. हा ग्रंथ जीवनातील योग्य निर्णय घेण्यास आणि चुका टाळण्यास मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अमित शाह यांच्या हस्ते यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत तसेच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ त्यांना गुजराती भाषेत वाचायला मिळाला होता. प्रत्येक तरुणाने हा ग्रंथ वाचावा, कारण भगवद्गीतेतील विचार सामान्य माणूस आपल्या दैनंदिन जीवनात कसे उतरवू शकतो, याचे अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शन या पुस्तकात आहे. युवकांनी टिळकांच्या विचारांचा स्वीकार केल्यास आयुष्यात योग्य दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा उल्लेख करताना शाह म्हणाले की, स्वातंत्र्य मिळविण्यापूर्वी राष्ट्रभावना जागृत करणे आवश्यक असल्याची भूमिका टिळकांनी मांडली होती. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून त्यांनी इंग्रजांविरोधात जनजागृती केली. सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून समाजाला संघटित करून राष्ट्रीय चेतना निर्माण करण्यात टिळकांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित डोवाल यांच्या कार्याचाही अमित शाह यांनी गौरव केला. समाज आणि राष्ट्रासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणजे समाजाच्या कृतज्ञतेची अभिव्यक्ती असते, असे ते म्हणाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारामुळे अजित डोवाल यांच्या कार्यातून विविध क्षेत्रातील नागरिकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



