अंगठ्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका! जाणून घ्या अंगठ्याच्या संधिवाताची करणे, लक्षणे..आणि उपचार

डॉ. सचिन नागापूरकर
अस्थिरोग तज्ज्ञ, पुणे
आपण गुडघ्याचा, खुब्याचा किंवा पायाच्या घोट्याचा संधिवात याबद्दल अनेकदा ऐकतो. मात्र हाताच्या अंगठ्याचा संधिवात किंवा ‘थम्ब ऑस्टियोआर्थरायटिस’ हा प्रकार अनेकांना नवीन वाटू शकतो. प्रत्यक्षात आजच्या काळात या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
हाताचा अंगठा ज्या ठिकाणी मनगटाजवळ सुरू होतो, त्या सांध्याला फर्स्ट CMC (Carpometacarpal) जॉइंट म्हणतात. या सांध्यामध्ये झीज होऊन वेदना, सूज आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाला की त्याला अंगठ्याचा संधिवात असे म्हणतात.

अंगठ्याचा संधिवात होण्याची कारणे
अंगठ्याच्या संधिवाताचे प्रमुख कारण म्हणजे वयोमानानुसार सांध्याची होणारी झीज. साधारणपणे वयाच्या ६० ते ६५ वर्षांनंतर या सांध्यातील वेदना आणि इतर त्रास वाढू शकतात. सांध्यातील वंगण कमी होणे, कार्टिलेजची झीज होणे आणि सांध्यावर ताण वाढणे यामुळे हा त्रास निर्माण होतो.
काही वेळा अंगठ्याच्या या सांध्याला पूर्वी फ्रॅक्चर किंवा दुखापत झालेली असल्यास पुढील काळात त्याठिकाणी संधिवात होऊ शकतो. तसेच संपूर्ण शरीरातील संधिवात, मधुमेह किंवा गाऊट यांसारख्या आजारांमुळेही सांध्यांच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
घरकाम किंवा हाताने सतत एकाच प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये अंगठ्याच्या सांध्यावर वारंवार ताण येत असल्यानेही हा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलचा अतिवापर, विशेषतः दोन्ही अंगठ्यांनी सतत टायपिंग करणे, यामुळे अंगठ्याच्या सांध्यावर वारंवार ताण पडत आहे.
कोणती लक्षणे दिसतात?
अंगठ्याच्या संधिवातामध्ये अंगठ्याच्या बेसजवळ, म्हणजेच मनगटाच्या बाजूला वेदना आणि सूज जाणवू शकते. काही रुग्णांना त्या ठिकाणी हाड बाहेर आल्यासारखेही जाणवते.
दैनंदिन कामे करताना वेदना होणे हे या आजाराचे महत्त्वाचे लक्षण आहे. उदाहरणार्थ, डब्याचे झाकण उघडणे किंवा बंद करणे, वस्तू घट्ट पकडणे, पिळणे किंवा अंगठ्याचा वापर करून एखादी वस्तू हाताळणे कठीण होऊ शकते. हळूहळू अंगठा आणि मनगटाची ताकदही कमी झाल्यासारखी वाटू शकते.
निदान कसे केले जाते?
अंगठ्याच्या संधिवाताचे निदान करण्यासाठी सुरुवातीला डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी आणि एक्स-रे केला जातो. रुग्णाच्या लक्षणांनुसार काही वेळा सोनोग्राफीची गरज भासू शकते.
औषधोपचार करूनही वेदना कमी होत नसतील किंवा समस्या अधिक गुंतागुंतीची वाटत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एमआरआय करण्याची आवश्यकता असू शकते. काही रुग्णांमध्ये इतर आजारांची शक्यता तपासण्यासाठी रक्ताच्या तपासण्याही केल्या जातात.
उपचार कोणते?
आजाराचे निदान झाल्यानंतर त्याच्या तीव्रतेनुसार उपचार पद्धती निश्चित केली जाते. सुरुवातीच्या अवस्थेत औषधोपचार, विश्रांती आणि आवश्यकतेनुसार स्प्लिंट किंवा पट्टीचा वापर करून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
अंगठ्यावर वारंवार ताण देणारी कामे आणि रिपीट वर्क कमी करणे महत्त्वाचे असते. योग्य पद्धतीने केलेली फिजिओथेरपी देखील अनेक रुग्णांना फायदेशीर ठरू शकते.
काही रुग्णांमध्ये वेदना आणि सांध्याची स्थिती लक्षात घेऊन सांध्यामध्ये इंजेक्शन देण्याची आवश्यकता भासू शकते. अत्यंत कमी प्रमाणातील आणि औषधोपचारांनी नियंत्रणात न येणाऱ्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रियेचा पर्यायही उपलब्ध असतो.
मोबाईल वापरताना काळजी घ्या
आजच्या काळात मोबाईल हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र सतत अंगठ्याने टायपिंग करणे, गेम खेळणे किंवा स्क्रीनवर वारंवार अंगठ्याची हालचाल करणे यामुळे हाताच्या सांध्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सतत एकाच प्रकारची हालचाल करण्याऐवजी मध्ये-मध्ये विश्रांती घेणे आणि हात-अंगठ्यांवर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
अंगठ्याच्या बेसजवळ सतत वेदना, सूज, ताकद कमी होणे किंवा दैनंदिन कामे करताना त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.



