चिमुकल्याचा जीव गेला, आता तरी जागे व्हा ! पुणे मनपाच्या पथ विभागाच्या कारभारावर गंभीर सवाल!

यंत्रसामग्री, हॉट मिक्स प्लांट, मनुष्यबळ सगळं असूनही खड्डे कायम; पथ विभागाच्या कारभाराची पोलखोल!
पुणे : सूस-म्हाळुंगे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून टेम्पोखाली आल्याने दहा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि महापालिकेच्या पथ विभागाच्या कार्यक्षमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देत पथ विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक वेळी कंत्राटदारांमार्फत टेंडर काढण्याची आवश्यकता आहे का, असा थेट सवाल या पत्रातून करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडे स्वतःची यंत्रसामग्री, हॉट मिक्स प्लांट, वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध असतानाही खड्डे बुजविण्याच्या कामात अपेक्षित कार्यक्षमता का दिसत नाही, याचा आयुक्तांनी आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांत हॉट मिक्स प्लांटने किती डांबर तयार केले?
पथ विभागाकडे स्वतःचा हॉट मिक्स प्लांट उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत या प्लांटमधून नेमके किती डांबराचे उत्पादन झाले, याची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. तसेच या प्लांटमधून कोणत्या-कोणत्या क्षेत्रीय कार्यालयांना किती प्रमाणात डांबर पुरविण्यात आले, याची माहितीही तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पेव्हर, रोलर, व्हायब्रेटरी रोलर यांसारख्या उपलब्ध यंत्रसामग्रीचा गेल्या तीन महिन्यांत किती आणि कुठे वापर करण्यात आला, याचा तपशीलही तपासणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काय काम केले?
पथ विभागातील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कामगारांनी गेल्या तीन महिन्यांत शहरातील खड्डे बुजविण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले, याचा हिशेब विभागप्रमुखांनी द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“पथ विभागाकडे खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध असताना टेंडर काढण्याची गरजच काय?” असा सवाल या पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.
‘सर्व संसाधने असूनही खड्डे कायम’
पथ विभागाकडे मोठ्या प्रमाणात संसाधने उपलब्ध आहेत. विभागाकडे स्वतःच्या गाड्या, मनुष्यबळ, यंत्रसामग्री तसेच १५ कोठ्या उपलब्ध असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. ही सर्व साधने योग्य पद्धतीने आणि इच्छाशक्तीने वापरली असती, तर पुणे शहरातील एकही खड्डा दिसला नसता, अशी भूमिका माजी पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
मात्र प्रत्यक्षात पथ विभागाकडून या संसाधनांचा अपेक्षित वापर होत नसून अधिकारी केवळ टेंडर काढण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत, असा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे.
आयुक्तांनी हॉट मिक्स प्लांटला भेट द्यावी
महापालिका आयुक्तांनी स्वतः पथ विभागाच्या हॉट मिक्स प्लांटला तातडीने भेट देऊन तेथील रजिस्टर, मेमो, उत्पादनाची नोंद, डांबर वितरणाची माहिती तसेच यंत्रसामग्रीच्या वापराचा तपशील तपासावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
काही अधिकारी हॉट मिक्स प्लांटवर केवळ डिझेल भरण्यासाठी आपल्या खासगी वाहनांचा वापर करतात, असा गंभीर आरोपही पत्रात करण्यात आला असून या बाबीचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘एका मुलाचा जीव वाचवता आला असता’
सूस-म्हाळुंगे रस्त्यावरील दुर्घटनेत एका दहा वर्षांच्या मुलाचा वडिलांच्या डोळ्यादेखत मृत्यू होणे ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. मात्र या घटनेपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे आवश्यक त्या सर्व सुविधा आणि संसाधने उपलब्ध असतानाही काम न करण्याची प्रवृत्ती असल्याचे पत्रात म्हटले आहे.
“महापालिकेकडे सर्व साधने उपलब्ध असताना योग्य वेळी खड्डे बुजविण्याचे काम झाले असते, तर कदाचित एका निष्पाप मुलाचे प्राण वाचले असते,” अशी खंत माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
क्षेत्रीय कार्यालयावर जबाबदारी ढकलणे चुकीचे
खड्ड्यांच्या समस्येची संपूर्ण जबाबदारी केवळ क्षेत्रीय कार्यालयांवर ढकलून मुख्य पथ विभागाने स्वतःची जबाबदारी झटकणे योग्य नसल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
पथ विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि इतर संसाधने उपलब्ध असताना मुख्य विभागाने या संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून काम करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्य विभागाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘टेंडर किती काढायचे, याचा फेरविचार करा’
महापालिका प्रशासनाने उपलब्ध संसाधनांचा आढावा घेऊन भविष्यात रस्त्यांच्या कामांसाठी किती टेंडर काढायची, याचा फेरविचार करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
“महापालिकेचा पथ विभाग स्वतः रस्त्यांची कामे सक्षमपणे करू शकतो. आपण नगरसेवक असताना पथ विभागामार्फत करून घेतलेले रस्ते आजही अनेक वर्षांनंतर चांगल्या स्थितीत आहेत,” असा दावा उज्ज्वल केसकर यांनी पत्रात केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पथ विभागाच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी, उपलब्ध यंत्रसामग्रीचा वापर, हॉट मिक्स प्लांटचे उत्पादन व वितरण, कर्मचारी आणि यंत्रसामग्रीच्या वापराचा गेल्या तीन महिन्यांचा लेखाजोखा तपासावा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली आहे.
“आवश्यक परवानगी दिल्यास आम्ही स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन उपलब्ध संसाधने आणि रस्त्यांची परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ,” असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.



