एमआयटी परिसरातील वाहतूक कोंडी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांचा पुढाकार

पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी आणि बैठक
पुणे : पौड रस्त्यावरील एमआयटी कॉलेज परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांना विद्यार्थ्यांची वाढती वर्दळ, कॉलेजच्या मोठ्या बसेस आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सोसायटीतील नागरिकांसोबत मिळून संबंधित प्रश्न वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी, कोथरूड पोलीस स्टेशन तसेच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात कॉलेज प्रशासनासोबतही सविस्तर बैठक घेऊन नागरिकांच्या अडचणी मांडल्या.
याबाबत बोलताना नगरसेवक हर्षवर्धन मानकर म्हणाले, या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्याचे आश्वासन वरिष्ठ ट्रॅफिक पीआय गवळी यांनी दिले आहेत.वाहतूक सुरळीत राहावी, विद्यार्थ्यांच्या वर्दळीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि कॉलेजच्या बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका मानकर यांनी यावेळी मांडली.

यासोबतच एमआयटी कॉलेज परिसरातील स्टॉलवर बेकायदेशीररीत्या सिगारेट विक्री होत असल्याच्या तक्रारींचीही तातडीने दखल घेण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला असून दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. यापुढे परिसरात सिगारेट विक्री होऊ नये, यासाठी कडक सूचना देण्यात आल्या असून नियमित तपासणीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या प्रत्यक्षात मार्गी लागाव्यात, यासाठी आवश्यक त्या यंत्रणांसोबत सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. असेही मानकर म्हणाले.



