बारावीची परीक्षा आठ, तर दहावीची १५ फेब्रुवारीपासून;राज्य मंडळाचे अंतिम वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.

या परीक्षांसोबतच प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षांचे वेळापत्रकही निश्चित केले आहे. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.



राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन करता यावे, यासाठी मंडळाने अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.



दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना जानेवारीअखेरीस प्रात्यक्षिक परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे.



संकेतस्थळावर माहिती
मंडळाने जाहीर केलेले वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असले, तरी ते केवळ माहितीसाठी आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना दिले जाणारे छापील वेळापत्रक अंतिम राहणार आहे. तसेच समाजमाध्यमे, व्हॉट्सॲप किंवा अन्य माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आणि शाळा-महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या माहितीनुसारच परीक्षेचे नियोजन करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.













































