पुणे शहर

नवले पुलाजवळ विचित्र अपघातात ट्रकची नऊ वाहनांना धडक

पुणे : कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्ग सतत होणाऱ्या अपघातांमुळे कायमचा चर्चेत राहिला आहे. आज देखील नऱ्हे आंबेगाव जवळील नवले पुल परिसरात घडलेल्या विचित्र अपघातात एका भरधाव ट्रकने समोर असलेल्या आठ ते नऊ वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एक महिला व रिक्षाचालक जखमी झाले आहेत. दुपारी एक वाजता घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. क्रेनने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

ट्रकने धडक दिल्याने चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच भारती पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एम एच १२ एल टी ४७५५ या क्रमांकाच्या कात्रज कडून नवले पुलाकडे उतारावरून भरधाव वेगाने जात असताना संबंधित ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने रस्त्यावरील वाहनांना जोरात धडक देत भीषण अपघात घडला. या अपघातात एक बलेरो जीप, सहा कार, एक दुचाकी , एक रिक्षा अशा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Img 20201213 wa0074

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून महामार्ग प्राधिकरणाने यासंदर्भात उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. मागेही अशाच प्रकारे ताबा सुटल्याने एक कंटेनर नवले पूल चौकाच्या बाजूला असणाऱ्या एका दुकानात घुसला होता. वडगाव पुलावरही अशाच प्रकारे अनेक वेळा अपघात घडले आहेत. या टप्प्यात घडलेल्या अपघातांमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे हे अपघाताचे सत्र थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये