गिरीश बापटांची भविष्यवाणी खरी ठरणार का ?

पुणे : “पुण्यात भाजपचे नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. भाजपचा एक ही नगरसेवक फुटणार नाही. आमच्या सत्ताकाळात पुण्यात विकास होत आहे. त्यामुळे येत्या 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा घौडदौड करेल. भाजपने लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळला असल्याने पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील, अशी भविष्यवाणी भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली.
पुणे महापालिकेची निवडणूक 2022 ला होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासून तयारीला लागलेले दिसत आहे.
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता
सध्या पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीला चीत करुन भाजपने पुणे महापालिकेची सत्ता मिळवली होती. अजित पवारांच्या पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता गेल्याने उलटसुलट चर्चाही झाल्या. अजित पवारांनीही पुणे महापालिका हातातून गेल्याची खंत अनेक वेळा बोलून दाखवली होती.

भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही.- बापट
पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतून मोठी इनकमिंग भाजपात झाली होती. मात्र यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.



मात्र या चर्चेचा भाजप खासदार गिरीश बापट यांनी इन्कार केला आहे. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा गिरीश बापट यांनी केला. इतकंच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही या चर्चेचं खंडण केलं आहे.



