भाजपचे सेनेविरोधात तर सेनेचे भाजप विरोधात झालेले आंदोलन जनतेच्या हितासाठी की राजकीय स्वार्थासाठी..

अमोल साबळे
पुणे : काल भाजपकडून राज्य सरकारच्या विरोधात महावितरणच्या वीज बिलांबाबत तर शिवसेनेने पेट्रोल दर वाढीबाबत केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात आंदोलने केली. पण खरच ही आंदोलने जनतेच्या हितासाठी का राजकीय स्वार्थासाठी करण्यात आली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (The agitation of BJP against Sena and the agitation of Sena against BJP is for the benefit of the people or for political interest. )
पेट्रोल दरवाढ व महावितरणने वीज बिलाबाबत पाठवलेल्या नोटिसा हे दोन्ही विषय सर्वसामान्य जनेतेच्या जिव्हाळ्याचे आहेत. पण या दोन्ही विषयांवरून आता राजकारण पेटताना दिसत आहे. खरं तर दोन्ही पक्षांनी जनतेच्या हितासाठी वरील दोन्ही प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे मात्र जनतेच्या हितासाठी सत्तेतील आपल्याच पक्षाच्या विरोधात कोण आंदोलन करणार ?

लॉकडाऊन मुळे अगोदरच सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे त्यातच आलेली वाढीव वीज बिले व ते नाही भरले तर वीज तोडीसाठी आलेली नोटीस हा एक मुद्दा तर दुसरीकडे पेट्रोल दरामध्ये दिवसेंदिवस होत चाललेली वाढ सर्वसामान्यांच्या किशावर भार टाकणारी ठरत आहे. कोरोना नंतरच्या या काळात हे दोन्ही प्रश्न जनतेसाठी त्रासदायकच आहेत.
भाजप नेते व कार्यकर्ते विज बिलांबाबत आंदोलन करताना पेट्रोल दरवाढीचा मुद्दा मात्र विसरत आहेत तर पेट्रोल दर वाढीवर आंदोलन करताना शिवसेना नेते व कार्यकर्ते विज बिले व नागरीकांना दिलेल्या नोटिसा हा मुद्दा विसरत आहेत. त्यामुळे वरील दोन मुद्द्यांसाठी एकमेकांच्या सरकार विरोधात आंदोलन करताना खरंच जनतेच हित साधल जाणार आहे का? राजकीय स्वार्थ साधला जात आहे एवढं तर जनतेला समजत असेलच.



