पुणे शहर

कोथरूडमधील सागर कॉलनी डिपी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न सुटला आणि सुरू झाली श्रेयवादाची लढाई

पुणे : गणंजय डीपी रस्त्यावरील सागर कॉलनी येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या घरे आणि दुकानांवर पालिकेच्या वतीने शुक्रवारी कारवाई करण्यात आली. आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले. मात्र यानंतर आजी माजी नगरसेवकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. तर यामध्ये आम्हाला श्रेय नका देऊ असे म्हणत मनसेनेही या वादात उडी घेतली आहे.The issue of widening of Sagar Colony DP road in Kothrud has been resolved and a battle of credit disputes has started.

स्थानिक भाजप नगरसेवकांची भूमिका

याबाबतीत भाजपच्या नगरसेवकांनी प्रसिद्धीस दिलल्या पत्रकात सागर कॉलनी येथील डी पी रस्त्याचे श्रेय आमदार चंद्रकांत पाटील,महापौर मुरलीधर मोहोळ,स्थानिक नगरसेवक दिलीप वेडेपाटील,किरण दगडे पाटील,अल्पना वर्पे आणि श्रद्धा प्रभुणे यांचेच आहे. निवडणूक जवळ आली की श्रेयासाठी ची धडपड सुरु होते – ही तडफड इतकी वाढते की न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला ही जनतेने नाकारलेले अनेक जण पुढे येतात आणि खोटे बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे वर्तन करतात.

Img 20210223 wa0156

वस्तुतः भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक कार्यतत्पर आहेत आणि हे प्रभागातील सुजाण नागरिक जाणतात गेली चार वर्षे हे चौघेजण हा रस्ता व्हावा यासाठी प्रयत्नशील होते. एवढेच काय नोव्हेंबर महिन्यात कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मनपा आयुक्तांसमवेत च्या बैठकीत हा विषय मांडला व याच्या पूर्णत्वाची जबाबदारी राजेंद्र मुठे  व संदीप कदम  यांच्याकडे सोपवली. त्यानंतर भाजपचे चार ही नगरसेवक सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत होते.याचे मिनिटस देखील उपलब्ध आहेत. असे पत्रकात नमूद केले आहे.

श्रेय घेण्यापेक्षा काम होणे महत्वाचे – पालिकेचे माजी सभागृहनेते शंकर केमसे यांची भूमिका

माजी नगरसेवक व माजी सभागृहनेते शंकर केमसे म्हणाले, या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे होते. या रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे मोबदल्या बाबत काही प्रश्न होते. नागरीक माझ्याकडे हे प्रश्न घेऊन आले. त्यानुसार मी सहाय्यक आयुक्त यांच्या सोबत या बाधित होणाऱ्या नागरिकांची बैठक आयोजित करून सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन केले. आणि त्याला प्रतिसाद देत दोन्ही बाजूने हा प्रश्न सामोपचाराने सुटला.

सागर कॉलनी रस्त्याचे श्रेय आम्हाला नकोच..!- मनसेची भूमिका

मनसे विभाग अध्यक्ष सुधीर धावडे म्हणाले,  नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोथरूड क्षेत्रिय कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर मनपा सहायक आयुक्त संदीप कदम यांच्याशी मनसे शिष्टमंडळाची विस्तृत बैठक झाली. कोथरूड मधील विविध प्रलंबित प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मनसे ला पुढे ह्या विषयावर परत आंदोलन करावं लागणार नाही अशी ग्वाही ही दिली. त्यानंतर मागील आठवड्यात मनसे ची पहिली मागणी डीपी रस्ता ( सागर कॉलनी ) रुंदीकरणाची कार्यवाही सुरू झाली व आज मनपा ने धडक कारवाई करत रुंदीकरण जागा मोकळी करून घेतली. आजही मनसेचे उपविभाग अध्यक्ष नितीन गायकवाड व कार्यकर्ते दिवसभर लोकांना मदत करत होते त्यांचं कौतुक.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये