वारजेत अग्निशमन केंद्राच्या कामाचे भूमिपूजन

वारजे : अनेक वर्षांपासून वारजेत अग्निशमन केंद्र करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. ही मागणी आता पूर्ण झाली असून वारजे करांची अग्निशमन केंद्राची प्रतीक्षा आता संपली आहे. नगरसेविका वृषाली चौधरी यांच्या प्रयत्नांतून महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या वारजेतील सर्व्हे नंबर १३० येथील अग्निशमन केंद्राच्या कामाचे भूमिपूजन आमदार भिमराव तापकीर व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. Bhumi Pujan of Warje Fire Station
यावेळी स्थानिक नगरसेविका वृषाली चौधरी, नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, दत्तात्रय चौधरी, भाजपा सरचिटणीस विठ्ठल बराटे, खडकवासला मंडल अध्यक्ष सचिन मोरे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, अग्निशमन दल प्रमुख प्रशांत रणपिसे, हेमंत बोरकर, किरण बारटक्के, अभिजीत धावडे व नागरिक उपस्थित होते.

वारजे माळवाडी चा वाढलेला परिसर त्याला लागून असलेला शिवणे, शिवणे इंडस्ट्रियल एरिया, उत्तमनगर, कोंढवे धावडे हा भाग त्यामुळे या परिसरासाठी अग्निशमन केंद्राची आवश्यकता होती. या भागात कधी आगी सारखी घटना घडली तर कोथरुड किंवा सिंहगड रस्त्यावरून अग्निशमन दलाचा बंब पोहचेपर्यंत बराच वेळ जात होता व त्यामुळे आग पसरण्याचा धोका वाढत होता. वारजे तून गेलेल्या महामार्गावर ही अनेकवेळा वाहनांना आग लागल्याच्या घटना घडत असतात. आता वारजे मध्येच अग्निशमन केंद्र होत असल्याने आगी सारखी घटना घडल्यास तत्काळ अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचू शकणार आहे व लवकर आग आटोक्यात आणण्यासाठी मदत मिळणार आहे.
वृषाली चौधरी यांनी सांगितले की, वारजेकरांची अग्निशमन केंद्राची अनेक दिवसांची असणारी मागणी पूर्ण करताना समाधान वाटत आहे. परिसरात आगी सारख्या घटना घडूच नयेत परंतु दुर्दैवाने अशा घटना घडल्यास तेथील आग लवकर आटोक्यात आणण्यास या अग्निशमन केंद्राची मोठी मदत मिळणार आहे.



