कर्वेनगरमधील ई लर्निंग स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार यांनी डॉ. कलाम यांच्या आठवणींना दिला उजाळा..

भविष्यात तंत्रज्ञानाच्या ज्ञानाच्या माहितीसाठी जगातील कंपन्या पुण्यावर अवलंबून असतील : शरद पवार
पुणे : pune city जगातील मोठ्या कंपन्या तंत्रज्ञानाचे ज्ञान विकसित करण्यासाठी व ते ज्ञान जगाला देण्या संबंधित यंत्रणा पुण्यात असेल. जगातील तंत्रज्ञानाच्या ज्ञानाची माहिती एकत्रित साठवून ती जगभरात प्रसारित करण्याची व्यवस्था भविष्यात पुण्यात असेल. त्या बाबतीतील काम सध्या पुण्यात सुरू आहे. असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार Sharad Pawar यांनी व्यक्त केले.
नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या पाठपुराव्यातून व राष्ट्रवादीचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या महापालिकेच्या माजी राष्ट्रपती ए.पी.जी डॉ. अब्दुल कलाम ई लर्निग स्कूल चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, अंकुश काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, नगरसेवक दीपक मानकर, दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, शिक्षण मंडळ अध्यक्षा, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, बाबा धुमाळ, बाबुराव चांदेरे, काका चव्हाण तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, तंत्रज्ञान आणि विज्ञान या दोघांचा स्वीकार करून पुढे जाण्याचे दिवस आहेत. देशात आयटी क्षेत्रात पुणे , बंगळूर आणि हैद्राबाद या तीन शहरांचे नाव घेतलं जाते. पुण्यामध्ये सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जोरदार काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात जगातील मोठया कंपन्या पुण्यावर अवलंबून राहणार आहे. त्या मोठ्या कंपन्यांची तंत्रज्ञान माहितीची गरज पुण्यातून पूर्ण होणार आहे.
यावेळी माजी राष्ट्रपती डॉ कलाम यांच्या विषयी आठवणी व्यक्त करताना पवार म्हणाले, मी देशाचा संरक्षण मंत्री असताना डॉ. कलाम माझ्या समवेत संरक्षण खात्याचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करीत होते. त्यांची राहणी अत्यंत साधी सरळ होती. अण्वस्त्र चाचणीच्या वेळेस ते मला आवर्जून घेऊन जात. मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. एकदा एक चाचणी अयशस्वी ठरली तर त्यांच्या डोळ्यात लहान मुलासारखे अश्रू आले होते पण क्षणार्धात ते विसरून ते नवीन वैज्ञानिकांना प्रोत्साहन देत पुढील मोहिमेच्या तयारीला लागत असत.
पवार पुढे म्हणाले, मी जेव्हा महापालिकेच्या कार्यक्रमांना इतर ठिकाणी जातो त्या ठिकाणी वास्तूंना घरातील व्यक्तींची नावे दिलेली असतात, माझा त्याला आक्षेप नाही पण नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी या ई लर्निंग स्कूलला डॉ. कलाम यांचे नाव देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. डॉ कलाम यांच्याकडे असणारी आधुनिकता, वैज्ञानिक दृष्टीकोन, साधेपणा असे संस्कार लहान वयातच या शाळेतील मुलांना मिळतील याचा विश्वास वाटतो. या शाळेतील वर्गांना डॉ कलाम यांनी तयार केलेल्या आयुधांची नावे देण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळी प्रेरणा मिळणार आहे. लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांनी या शाळेसाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे कौतुक वाटते.
नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वी.दा. पिंगळे यांनी केले तर विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी आभार मानले.






