पुणे शहर

कर्वेनगरमधील वनदेवी वनोद्यान टेकडीवरील सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची अज्ञातांकडून तोडफोड..

कर्वेनगर : कर्वेनगरमधील वनदेवी वनोद्यान टेकडीवर बसवण्यात आलेले सौर उर्जेवर चालणारे असंख्य दिवे दगड मारून फोडण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला आहे. त्यामुळे नियमित टेकडीवर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

कर्वेनगर मधील वनदेवी मंदिरामागे असणाऱ्या टेकडीवर वन विभागाच्या वतीने वनदेवी वनोद्यान विकसित करण्यात आले आहे. या टेकडीवर अनेक नागरिक नियमित चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येत असतात. टेकडीवर चालण्यासाठी असणाऱ्या मार्गावर सौर उर्जेवर चालणारे दिवे बसवण्यात आले आहे. मात्र गुरुवारी रात्री यातील दहा ते पंधरा दिवे टोळक्याकडून  दगड मारून फोडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चेतन भालेकर यांनी केली आहे.

या टेकडीवर प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या गेट व्यतिरिक्त इतरही ठिकाणावरूनही आत प्रवेश करण्यासाठी जागा आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अशा जागेतून टेकडीवर प्रवेश करून काही मुलं असा प्रकार करत असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक आहे पण रात्रीच्या अंधारात येऊन असे प्रकार केले जात असल्याने तोही हतबल झाला आहे. त्यामुळे टेकडीवर गेट शिवाय इतर ठिकाणावरून आत येता येणार नाही अशी व्यवस्था वन विभागाने करावी व असे चुकीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी अशी मागणी चेतन भालेकर यांनी केली आहे.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये