आधी अग्निशमन दलात जवान व आता आरोग्य निरीक्षक असताना दाखवले प्रसंगावधान; आगीवर केली मात.

पुणे – आज सकाळी नऊच्या सुमारास वडारवाडी येथील सावंत चौकात असणारया मैनेजमेंट कॉलेज, कैलास हाऊसिंग सोसायटी लगत एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरने अचानक पेट घेत रौद्र रुप धारण केले होते. त्याची वर्दी नागरिकांनी अग्निशमन दल व महावितरण यांना दिली. कसबा अग्निशमन केंद्र येथून लगेच वाहन रवाना करण्यात आले.
त्याचवेळी तेथे कर्तव्य बजावणारे महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका आरोग्य कोठीचे आरोग्य निरीक्षक व यापूर्वी अग्निशमन दलात काम केलेले जवान विनोद सरोदे हे तिथे हजर होते. त्यांनी वेळेचे गांभीर्य व आगीचा भडका पाहून अनुभवाच्या जोरावर त्यांनी जेट मशिनच्या पाईपचा आधार घेत धाडसाने भिंतीवर चढून पाण्याचा मारा करत आग शमवली व धोका दूर केला. त्याचवेळी अग्निशमनचे वाहन व महावितरणचे कर्मचारी ही दाखल झाले. अग्निशमन व महावितरणने पुढील कार्य पार पाडले.
विनोद सरोदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे नागरिक व इतर जवानांनी कौतुक केले. कसबा अग्निशमन केंद्र येथील चालक संदीप थोरात, संतोष अरगडे, गणेश लोणारे, सुरेश पवार यांनी सहभाग घेतला.







