महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

ओबीसी आरक्षण नसल्यास या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यपालांनी त्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी तरतूद करणारं विधेयक राज्याच्या विधिमंडळात पारीत करण्यात आले आहे. सर्वपक्षीय पाठिंब्यावर हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर त्यावर राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा होती. राज्यपालांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे या विधेयकाचं कायद्यामध्ये रुपांतर झाले आहे.“राज्यपालांनी विधेयकावर सही केली आहे. आज त्यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली आहे. सर्व बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर राज्यपालांनी या विधेयकावर सही केली आहे. आता हा विषय संपलेला आहे. राज्यपालांना त्यासाठी मी धन्यवाद देतो. सर्व पक्षांनी एकमताने ते विधेयक मंजूर केलं होतं. त्यावर राज्यपालांनी सही केल्यानंतर आता हा विषय संपला असून एक चांगलं वातावरण तयार झालं आहे”, असे अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात मुंबईसह इतर काही महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील महिन्याभरात होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये