महाराष्ट्र

शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले; कोकणात राडा

सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपद निवडणूक आता शिवसेना-काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेना-काँग्रेस नगरसेवक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक कुडाळमध्ये आल्यानंतर पुन्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. शिवसेना-काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित आले आहेत. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असून, राणे यांना पुन्हा धक्का देण्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांची ओळख परेड केली. दुसरीकडे कुडाळ शहरात काँग्रेसमय वातावरण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेसने पक्षाचे झेंडे लावले आहेत. जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. कुडाळ नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या 9 नगरसेवकांनी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आफ्रिन करोल यांच्या विजयासाठी कणकवली येथून कुडाळकडे रवाना झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. कुडाळ नगराध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक कुडाळ नगरपंचायत इमारतीच्या जवळ आले. त्याचवेळी शिवसेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये