संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळाचा ‘श्री खंडोबा महात्म्य’ जिवंत देखावा पाहण्यास पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी

माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांच्या हस्ते झाले देखाव्याचे उद्घाटन
पुणे : मागील वर्षी ‘शिव-पार्वती विवाह सोहळा’ या भव्य जिवंत देखाव्याच्या माध्यमातून गणेशभक्तांची मोठी गर्दी खेचून घेणाऱ्या कोथरूड मधील संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळाने यंदाही आपली देखाव्याची परंपरा कायम ठेवत ‘श्री खंडोबा महात्म्य’ हा आकर्षक जिवंत देखावा सादर केला आहे. देखाव्याच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने हा देखावा या गणेशोत्सवात पुण्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बांधकाम व्यावसायिक प्रवीण बढेकर, मंडळाचे उत्सवप्रमुख उमेश भेलके, अक्षदा भेलके, जेजुरी देवस्थान विश्वस्त पांडुरंग थोरवे, अध्यक्ष, धनेश हगवणे, संतोष भेलके, ऋषिकेश कुंबरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



दरवर्षी पौराणिक विषयांवर प्रभावी देखावे सादर करण्यासाठी मंडळाची ओळख आहे. विशेषतः मागील वर्षी सादर करण्यात आलेल्या ‘शिव-पार्वती विवाह सोहळा’ या जिवंत देखाव्याला दहा दिवस विक्रमी प्रतिसाद मिळाला होता. या देखाव्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे यंदा संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ कोणता देखावा सादर करणार, याबाबत गणेशभक्तांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
अखेर देखाव्याचे उद्घाटन झाल्यानंतर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला. ‘श्री खंडोबा महात्म्य’ या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून भगवान खंडोबा यांच्या जीवनाशी संबंधित विविध प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आले आहेत. घोड्यावर स्वार होऊन येणारे खंडोबा, तसेच खंडोबा, म्हाळसा आणि बाणू यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे प्रसंग देखाव्यात साकारण्यात आले आहेत.
देखाव्यादरम्यान होणारी भंडाऱ्याची उधळण, त्यासोबत नागरिकांमधून घुमणारा ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ चा जयघोष आणि प्रत्यक्ष जिवंत प्रसंगांचे सादरीकरण यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे. प्रकाशयोजना, वेशभूषा, पात्रांचे सादरीकरण आणि प्रसंगांची मांडणी यामुळे देखावा अधिक उठावदार ठरत आहे.
उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली. त्यामुळे पुढील दिवसांत या देखाव्याला मोठी गर्दी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“मागील वर्षी ‘शिव-पार्वती विवाह सोहळ्या’ला गणेशभक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदाही ‘श्री खंडोबा महात्म्य’च्या माध्यमातून भक्तांना धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा असून, पुढील आठ दिवस बहुसंख्य पुणेकर हा देखावा पाहण्यासाठी येतील,” असा विश्वास मंडळाचे उत्सवप्रमुख उमेश भेलके यांनी व्यक्त केला आहे.









