पुणे शहर

बावधन मध्ये महिलाशक्तीचा जागर!  ‘सिद्धीच्या गणपती’ची दिमाखात प्राणप्रतिष्ठापना

ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक मिरवणुकीने गणरायाचे आगमन; तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती ठरतेय आकर्षण

पुणे : महिलांचा गणपती म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण केलेल्या बावधनमधील ‘सिद्धीच्या गणपती’ची प्राणप्रतिष्ठापना यंदा मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांनी एकत्र येत स्थापन केलेल्या या गणपतीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून बावधनमध्ये महिलाशक्तीच्या एकत्रीकरणाचे अनोखे दर्शन घडत आहे.

Img 20260915 wa01377978582778487558003


बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजसमोरील मैदानावर बावधनच्या माजी सरपंच पीयुषा किरण दगडे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिद्धीचा गणपती’ची स्थापना करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून, गेल्या चार वर्षांत महिलांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रोत्साहनपर उपक्रम राबविल्यामुळे ‘सिद्धीचा गणपती’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सलग तीन वर्षे ‘सिद्धीच्या गणपती’ला ‘मोरया पुरस्कारात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289



यंदा गणरायाचे आगमनही तितकेच दिमाखदार झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुकीत बावधन आणि परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साहपूर्ण सहभागातून महिलांनी आपल्या कार्यकौशल्याची चुणूक दाखवून दिली.

यंदाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून या देखाव्याबरोबरच गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Img 20260915 wa01352738246853918278544



महिलांसाठी महिलांनी उभारलेला गणपती

‘सिद्धीचा गणपती’ हा केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता महिलांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणूनही काम करत आहे. महिलांनी महिलांसाठी बसविलेला हा गणपती स्त्रीशक्तीचे प्रभावी रूप समाजासमोर मांडत आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महिलांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.

“उत्तम देखावा आणि अत्युत्तम कार्यक्रम यासोबतच महिलांनी एकमेकींची ओळख वाढवावी, एकमेकींना आधार द्यावा, उत्साह वाढवावा, त्यांच्या व्यवसायाला हातभार लागावा आणि नव्या पिढीसमोर एक चांगला आदर्श निर्माण व्हावा, हा ‘सिद्धीचा गणपती’ बसवण्यामागचा मुख्य हेतू आहे,” असे बावधनच्या माजी सरपंच पीयुषा किरण दगडे पाटील यांनी ‘सिंहासन न्यूज’शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रभर पोहोचली बावधनची ओळख

“गेल्या चार वर्षांपासून विविध क्षेत्रांतील महिला एकत्र येऊन बावधनमध्ये ‘सिद्धीचा गणपती’ बसवत आहेत. महिलांनी बसवलेला गणपती म्हणून ‘सिद्धीच्या गणपती’ची महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली असून, ही बावधनसाठी अभिमानाची बाब आहे. गणपतीच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन चांगला उपक्रम राबवत असून, त्या समाजाला सकारात्मक संदेश देत आहेत. पारंपरिक गणेशोत्सवाची मूळ परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कामही त्या करत आहेत,” असे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

महिलांचा सहभाग, सामाजिक बांधिलकी, पारंपरिक गणेशोत्सव आणि आकर्षक सांस्कृतिक उपक्रम यांचा सुरेख संगम साधणारा ‘सिद्धीचा गणपती’ यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये