कोथरूडमध्ये कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई… केला दंड वसूल

कोथरूड : कबुतरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त असून काही नागरिक कबुतरांना खाद्य टाकत असल्याने आयते खाद्य मिळत असलेल्या ठिकाणी कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. आयते खाद्य मिळत असलेल्या ठिकाणापासून जवळच्या सोसायट्यांच्या इमारतीच्या आडोश्याला ही कबुतरे आश्रय घेत असून या कबुतरांच्या उपद्रवामुळे सोसायट्यांमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आज नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर कोथरूड मध्ये कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण तसेच लक्ष्मी नगर वसाहतीमध्ये कबुतर प्रेमी नागरिक कबुतरांना खाद्य टाकत असल्याची तक्रार सदर भागात कार्यरत असलेले मोकादम वैजीनाथ गायकवाड व अण्णा ढावरे यांना भ्रमणध्वनीद्वारे नागरिकांकडून करण्यात आली. त्यांनी संबंधित ठिकाणी पहाणी केली असता त्यात तथ्य अढळले. लक्ष्मीनगर मधील काही किराणा दुकानदार कबुतरांस धान्य टाकत असताना दिसून आले. तसेच इतर ठिकाणी ही काही नागरिक कबुतरांना खाद्य टाकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा एकूण पाच नागरिकांवर कारवाई करत प्रत्येकी पाच हजार दंड वसूल करण्यात आला.
आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड व अण्णा ढावरे यांनी ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शना खाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केली.

कोथरूड मधील लक्ष्मीनगर भागातील टेकडीवरील व कोथरूड परिसरातील विशेषतः सर्व झोपडपट्टी परिसरातील एक वर्षापूर्वी कबुतरांच्या ढाबळीवर कारवाई करून त्या बंद करण्यात आल्या होत्या व संबधीत कबुतर प्रेमीना कबुतरे न पाळण्याचा व कबुतरांच्या थवे एकत्र करून खाद्य टाकण्यात येऊ नये अशा सूचना करण्यात आल्या होत्या. या कारवाई नंतर कोथरूड भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात कबुतरांच्या ढाबळी व कबुतरांचे थवेच्या थवे दिसणे बंद झाले आहे. त्यामुळे कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय हे ढाबळीमुक्त झाले आहे. पण काही ठिकाणी जुन्या इमारतींच्या वळचणीला तसेच पडीक इमारती या ठिकाणी कबुतरांचा वावर दिसून येत आहे. या कबुतरांना आयते खाद्य मिळत असल्याने त्यांचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाच्या वतीने अशा ठिकाणाची आरोग्य निरिक्षक व मोकादम यांनी पहाणी करून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषगांने आजची कारवाई पार पडली.





