सुनेत्रा पवारांचं खडकवासला मतदारसंघातील मताधिक्य वाढवण्यासाठी अजित पवार यांचं जातीने लक्ष..

अजित पवारांचा मतदारांशी प्रत्यक्ष भेटी आणि संवादावर भर
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यामधील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे नाही तर देशाचे लक्ष लागलेले आहे. दोन्ही उमेदवारांना विजयासाठी खडकवासला मतदार संघातील मताधिक्य महत्वाचे आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी खडकवासला मतदार संघात जातीने लक्ष दिले असल्याचे दिसत आहे.
मागील दोन दिवसात अजित पवार यांनी खडकवासला मतदार संघातील वारजे माळवाडी, शिवणे उत्तमनगर, कोंढवे परिसरातील सोसायट्यांमध्ये बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. पवार यांनी वारजेतील आदित्य गार्डन सिटी, सिप्ला, राजयोग, ईशाननगरी या सोसायट्यांमध्ये बैठका घेत मतदारांशी थेट संवाद साधताना त्यांचे प्रश्न जाणून घेतले, तसेच नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी त्याच्या बरोबर आमदार भिमराव तापकीर, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेवक दिलीप बराटे, किरण बारटक्के, सचिन दांगट, वासुदेव भोसले व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वारजे बरोबरच अजित पवारांनी शिवणे येथील स्नेहविहार, सद्गुरू सोसायटी, उत्तमनगर येथील यशवंतनगर, कोंढवे धावडे येथील फ्युजन सोसायटी येथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या बरोबर आमदार भिमराव तापकीर, बाबा धुमाळ, दिलीप बराटे, रमेश कोंडे, सचिन दांगट, अरुण दांगट, सुभाष नाणेकर, संगीता आठवले, नितीन धावडे उपस्थित होते.
मताधिक्य वाढवण्यासाठी अजित पवार स्वतः खडकवासला मतदार संघावर लक्ष ठेवून आहेत. पार्थ पवार यांच्याही सतत या भागात पदयात्रा, रॅली, गाठीभेटी सुरू आहेत. उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या अगोदरच पदयात्रा, सोसायट्यांना भेटी असा प्रचार पार पडला असून अजून नियोजन करण्यात आले आहे.
खडकवासला मतदार संघातून कायमच भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळत आले आहे. परंतु नेहमी पेक्षा जास्तीत जास्त मताधिक्य घेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असून तशी यंत्रणा त्यांच्याकडून लावली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर खडकवासला मतदार संघातील महत्वाचे पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत आहेत. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीही या भागात चांगला जोर लावला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना कसा फायदा होतोय हे पाहावे लागणार आहे.









