पुणे शहर

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वांत महत्त्वाचे माध्यम- झारखंडचे नागरी संऱक्षण आयुक्त रमेश घोलप यांचे प्रतिपादन

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ साजरा

पुणे : यशापयश हा आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. कुठल्याही अपयशाला घाबरू नका, मात्र कठोर प्रयत्नांमध्ये कसर सोडू नका. सातत्याने स्वतःची गुणवत्ता वाढवत राहा. ज्या समाजाचा आपण भाग आहोत, त्या समाजाच्या परिवर्तनाचे शिक्षण हे सर्वांत महत्त्वाचे माध्यम आहे आहे, याचे स्मरण ठेवा, असा सल्ला प्रशासकीय अधिकारी व सध्या झारखंड येथे नागरी संरक्षण आयुक्तपदी कार्यरत असणार्या रमेश घोलप यांनी रविवारी येथे विद्यार्थ्यांना दिला. “आपला समाज, देश, शिक्षक, पालक या सर्वांप्रती कृतज्ञता ठेवा. उंच अशोकवृक्षापेक्षा उपयुक्त वटवृक्षाचा आदर्श ठेवा. यशाची पंढरी प्रत्येकाला लाभो”, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री आणि पुण्याच्या खासदार मुरलीधर मोहोळ संस्थापक-अध्यक्ष असलेल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात घोलप मार्गदर्शन करत होते. या गौरव उपक्रमाचे हे सलग २४ वे वर्ष होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सकाळी हा सोहळा झाला. ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी गौरव करण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्यासह नगसेवक नीलेश कोंढाळकर, दिनेश माथवड, वासंती जाधव, ज्योत्स्ना कुलकर्णी, अल्पना वरपे, महेश शिंदे आदी मान्यवरही उपस्थित होते.

Img 20260222 wa00063491038201882637992

प्रतिकूल परिस्थितीतून उच्चशिक्षण प्राप्त केलेले तसेच कठोर परिश्रमांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आव्हानात्मक परीक्षांमध्ये सर्वोच्च गुणवत्तेने यश संपादन केलेले प्रशासकीय अधिकारी रमेश घोलप यांनी मनोगतातून स्वतःच्या वाटचालीचा प्रवास तर उलगडलाच पण स्वतःमधील गुणवत्तेची नेमकी दिशा ओळखण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. “खेडेगावात वाढलेला मी शिक्षणासाठी पुण्यात आलो, पदवीधर झालो, नोकरी पटकन मिळावी म्हणून डीएड झालो, मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवली, पण स्पर्धा परीक्षेत सुरवातीला अपयश आल्यावर थेट ग्रामपंचायत निवडणुकीत पनेल उतरवले. तिथे सपशेल पराभूत झाल्यावर हे आपले क्षेत्र नाही, हे ओळखले आणि पुन्हा निश्चय करून स्पर्धा परीक्षेत उतरलो, तो राज्यात पहिल्या क्रमांकाचा मानकरी झाल्यावरच गावात गेलो”, असा अनुभव त्यांनी सांगितला.

ते पुढे म्हणाले, ‘यशाची व्याख्या गुणपत्रिकेपुरती नसते. ते फक्त त्या वर्षाचे मूल्यमापन असते. खरी गुणवत्ता आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये असावी लागते. त्यासाठी आपली गुणवत्ता नेमकी कशात आहे, हे ओळखणे गरजेचे आहे. यश तुमच्या गुणपत्रिकेत नसते. ते तुमच्या प्रयत्नांमध्ये, सातत्यामध्ये असते. आपल्या अडचणी, समस्या, आव्हाने याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका. तीच प्रेरणा माना कारण संधी तिथेच असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच समस्या, अडचणींच्या सबबी केल्या नाहीत. त्यांनी तीच प्रेरणा ठरवली आणि मार्ग शोधले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार लांबचे टप्पे पाहू नका. नजिकच्या भविष्याचा अंदाज घ्या, पुढचा टप्पा ओळखा आणि पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करा. आपली स्वप्ने आपल्या परिश्रमांच्या भक्कम पायावर उभी करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल”.

संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वागतपर प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या उद्देशाची माहिती दिली. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी वेगवेळ्या टप्प्यांवर जीवनप्रवास सुरू करतात. भावी काळात ते विविध क्षेत्रात यश मिळवतात.  जबाबदार नागरीक म्हणून भूमिका निभावतात. त्यांच्या या प्रवासाच्या सुरवातीच्या टप्प्यावर त्यांचे कौतुक करावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे, हा प्रतिष्ठानचा हेतू आहे. या प्रवासात पालक आणि शिक्षकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण असते. अशा वळणावर उत्तम कारकिर्दीचे,  जबाबदार नागरीकत्वाचे आदर्श ज्यांनी निर्माण केले आहेत,  अशांचे मार्गदर्शन मिळावे, हाही उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित भारताचे स्वप्न साकारण्याची जबाबदारी युवा पिढीवर असून, त्यासाठी तरुणाईने योगदान द्यावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले.

डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ‘मार्कलिस्ट तुम्हाला मोठे करत नाही तर माणुसकी मोठे करते, हे लक्षात ठेवा. कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असले तरी ते साधन आहे. दिशा आणि मार्ग आपल्याला ठरवायचे आहेत. त्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे. त्या भक्कम पायावर उच्चशिक्षणाची इमारत उभारायची आहे. हा गौरव समारंभ फक्त कौतुकासाठी नाही तर त्याच्या सोबतीने तुमच्यावरील जबाबदारी आणि अपेक्षाही यात समाविष्ट आहेत. पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. मुलांसाठी संपत्तीपेक्षा संस्कार आणि संस्कृतीचा वारसा ठेवा. ताण, नैराश्य, असुरक्षितता यामुळे विद्यार्थ्यांचे भोवतालाशी नाते तुटते. त्यातून वाचण्यासाठी समतोल शिकवा. यशस्वी माणूस व्हा, पदापेक्षा व्यक्तिमत्त्व मोठे असते, हे जाणून ज्ञान, गुणवत्ता, संस्कार यांच्या आधाराने समाजसेवेचा आविष्कार घडवा’, असे त्यांनी सांगितले.

प्रवीण तरडे म्हणाले, “संस्कृती प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमांतील सातत्य उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याची लेणी स्वतःच्याच छिन्नी, हातोड्याने खोदायची आहेत आणि त्यासाठी इच्छाशक्ती, कठोर मेहनतीला पर्याय नाही. अतिशय वेगाने बदलणार्या युगाचे तुम्ही प्रतिनिधी आहात. त्यामुळे आपले क्षेत्र नेमकेपणाने निवडा”.

चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षीय समारोप करताना ‘करिअरच्या वाटा शेकड्याने आहेत. शासनाकडील यादीनुसार ८४२ प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आपली वाट नेमकी कुठली, हे निवडण्याचे भान विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी बाळगावे’, असे आवाहन केले. समाजघटक म्हणून वावरताना, प्रत्यक्ष न दिसणारा पण सतत सोबत असणारा समाज नावाचा एक घटक प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे खूप काही करत असतो, याची जाणीव ठेवा. पालकांनीही मुलांवर देण्याचा संस्कार करणे महत्त्वाचे आहे. मुरलीधर मोहोळ हे संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजासाठी असे देण्याचे संस्कार करत आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.

रेल्वेच्या सिग्नल विभागात कार्यरत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवणाऱ्या आशिष वाक्चौरे यांचा आणि अवघ्या सव्वादोन वर्षे वयात हनुमान चालिसा मुखोद्गत असणार्या ध्रुव पवार यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

संस्कृती प्रतिष्ठान घेणार १०० विद्यार्थ्यांचे पालकत्व !

लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांमधील मराठी अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा, या उद्देशाने संस्कृती प्रतिष्ठान आणि ज्ञानदीप ॲकडमीच्या माध्यमातून १०० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले जाणार असून या उमेदवारांच्या निवडीसाठी येत्या ॲागस्ट महिन्यात ॲानलाईन प्रवेश प्रक्रिया केली जाणार आहे. यातील १०० विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आणि आवश्यक ती पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये