कोथरुड

कोरोनाच्या संकटकाळी रक्तदान करणारे देवदूत

कोथरुड : एरंडवणा येथील प्रगती इंडस्ट्रियल इस्टेट मधील छोटे कारखानदार, उद्योजक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन रोटरी क्लबच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटकाळी रक्तदान करणारे हे माझ्या दृष्टीने देवदूत असून त्यांच्या ह्या कार्याबद्दल समाज त्यांचा कायम कृतज्ञ राहील असे गौरवोद्गार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.

या शिबिरात ७५ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले. रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांना महापौरांच्या हस्ते  प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संयोजक दीपक नानिवडेकर, चेतन धारिया, क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोटरी क्लब ऑफ कर्वेनगरच्या प्रेसिडेंट आकांक्षा पुराणिक, राजेश कुलकर्णी, प्रसन्न उमराणी, दिनेश गणेशवाडे, विवेक जोशी आदी उपस्थित होते.

मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या, कोरोनाचे संकट गडद होत असताना विविध सेवाकार्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग स्पृहणीय असून पुणेकर एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ या उक्तीप्रमाणे कृती करत आहेत.

रक्ताची टंचाई असल्याचे वाचनात आले व त्यामुळे अनेक रुग्णांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तातडीने रक्तदान शिबीर आयोजित केल्याचे उद्योजक दीपक नानिवडेकर, राजेश कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच या कार्यात रोटरी क्लब ऑफ कर्वेनगर व प्रगती इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता ही व्यक्त केली. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये