महाराष्ट्र

बारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडी आक्रमक; ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक

रत्नागिरी : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध दर्शविला आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर तो होऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्यावर महाविकास आघाडीतील नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सरकारला जालियनवाला बाग हत्याकांड करायचंय : राऊत


शिंदे-फडणवीस सरकारला या प्रकल्पावरून जालियनवाला बाग सामूहिक हत्याकांड करायचे आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याकडे लक्ष देऊन सरकारने हा प्रकल्प हाती घ्यावा, असे मत व्यक्त केले. स्थानिकांच्या प्रकल्पाबद्दल काही अडचणी असतील तर त्या दूर करूनच रिफायनरी प्रकल्प राबवावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. या प्रकल्पाविषयी स्थानिक जनतेच्या मनात शंका असतील तर सरकार त्याचे निरसन का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांचा फौजफाटा घेऊन सर्वेक्षण करणे ही दडपशाही खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून स्थानिक नागरिकांचे आंदोलन सुरू असताना सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. बारसू रिफायनरीमध्ये कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय? असा सवालही त्यांनी केला. सरकारने स्थानिक लोकांची दडपशाही आणि प्रकल्पाचे सर्वेक्षण तात्काळ थांबविण्याची मागणी त्यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मातोश्रीवर सर्व ठाकरे गटाच्या खासदारांची तातडीची बैठक घेतली. या मुद्यावर आंदोलनाची भूमिका ठरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्यावर प्रत्युत्तर दिले. उदय सामंत यांनी बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनीच दिलेल्या पत्राचा दाखला दिला आहे. आधी प्रकल्पाचे समर्थन करायचे आणि नंतर स्थानिकांनी आंदोलन केल्याचे सांगून प्रकल्पाला विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका उद्धव ठाकरे घेत असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये