कर्वेनगरमधील घटना ; सरपण काढत असताना विषारी सापाने केला दंश..

कर्वेनगर : स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी सरपण काढत असताना एका कामगाराला सर्प दंश झाल्याची घटना कर्वेनगर मध्ये घडली. संबधित कामगाराला तातडीने ससून रुग्णालयात हलवून उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्वेनगर स्मशान भूमीत अंत्यविधी साठी सरपण ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अंत्यविधी साठी सरपण काढत असताना राजेश सरोज (वय ३०) या कामगाराला सरपणात बसलेल्या विषारी घोणस सापाच्या पिल्लाने दंश केला. थोड्यावेळात राजेशला चक्कर येऊ लागल्याने त्याच्या हाताला सर्प दंश झाल्याचे दिसून आले. त्याला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले.
तेथील काही जणांनी घोणस सापाच्या पिल्लाला पकडुन अधिवासात सोडून दिले आहे. याठिकाणी आणखी सापाची पिल्ले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्वेनगर स्मशानभूमी मुठा नदी काठी आहे. नदीकडेने स्मशान भूमीला लागून मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आहेत. त्यामुळे साप स्मशानभूमीच्या आवारात आला असावा असे सांगितले जात आहे.










