पुणे महानगरपालिकेच्या प्रभात रस्त्यावरील संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश..
अशी संगीत विद्यालये पुणे शहरात विभागनिहाय सुरू करावीत : बाबा धुमाळ
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पुणे महानगरपालिकेच्या प्रभात रोड येथील संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनी या संगीत विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महापालिकेच्या संगीत विद्यालयाचे एकूण ५४ विद्यार्थी विशेष योग्यतेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, तसेच ८९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. द्वितीय श्रेणीत ४२ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक मंगेश रघुनंदन, राजहंस, दीपाली कोल्हटकर, अर्चना इरपतगिरे व उमेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. या परीक्षा घोलेरोड विभागाच्या सहा. प्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पार पडल्या. महापालिकेच्या संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
दिनांक ९ ऑक्टोबर २०१३ रोजी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणेमहानगरपालिक संचलित संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनी हे संगीत विद्यालय स्थापन झाले. त्यावेळचे शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांच्या संकल्पनेतून या संगीत विद्यालयाची प्रभात रोड येथे स्थापना झाली आणि संगीत विद्यालयाचा प्रवास सुरू झाला. शाळेत एकूण १९० विद्यार्थी गायन ,हार्मोनियम व तबला विषयाचे ज्ञान घेत आहेत. संगीत विद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
अशी संगीत विद्यालये पुणे शहरात विभागनिहाय सुरू करावीत : बाबा धुमाळ
बाबा धुमाळ म्हणाले की, महापालिकेचे संगीत विद्यालय असावे ही संकल्पना नवीन होती. कला, संगीत याचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पुणे शहरात सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनाही आपल्यातील कलेला वाव देता यावा यासाठी शिक्षण मंडळाचा अध्यक्ष असताना प्रभात रस्त्यावर महापालिकेचे संगीत विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घतला. आज या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश पाहताना मनाला समाधान मिळत आहे.
आज पुणे शहरात पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या ३०८ शाळा आहेत. समाविष्ट गावांमुळे ती संख्या आणखी वाढणार आहे. आता एकच संगीत विद्यालय सुरू आहे. शहराच्या प्रत्येक उपनगरातील आवड असलेल्या विद्यार्थ्यांना संगीत कलेचे शिक्षण घेता यावे या करिता प्रत्येक विभागात संगीत विद्यालय सुरू करावे अशी मागणी आपण महापालिकेकडे केली आहे असे धुमाळ यांनी सांगितले.