भाजप विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातून फुंकणार ; उद्या अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाचे अधिवेशन..
पुणे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या पुण्यात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे महत्त्वपूर्ण अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह राज्यातून येणाऱ्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजप पुण्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे दिसत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच पुण्यात या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ह्या अधिवेशनाला एक वेगळे महत्त्व आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूकीत भजपला फटका बसला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोकसभेला झालेल्या चुका घडू नयेत यासाठी भाजपचा प्रयत्न असणार आहे.
राज्यातील सर्व महत्वाचे नेते उद्या पुण्यात असणारा आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीत जागा वाटप कसे करायचे कारण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात अनेक जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची जागा वाटपा बाबतची मते अमित शाह या अधिवेशना दरम्यान जाणून घेतील अशी शक्यता आहे. तसेच निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांवर कोणती जबाबदारी द्यायची यावरही या अधिवेशनात चर्चा होईल. या अधिवेशनात घडणाऱ्या घडामोडीनंतर भाजपकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल.
राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याने पक्षाकडून तशी जय्यत तयारी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथे करण्यात आली आहे.