आत्मविश्वास डगमगला की ज्योतिष आठवते; बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

नाशिक : राजकारणात हात दाखवणे व हात वर करून दाखवणे यात फरक आहे. तुम्ही काम नाही केलं तर जनता हात दाखवते. एकदा आत्मविश्वास डगमगला, की हे सर्व उद्योग सुरू होतात, असा खोचक टोला राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी सिन्नरमधील एका ज्योतिषाला भेटून हात बघितला, अशी चर्चा आहे. थोरात म्हणाले, घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा दावा करत अनेकांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या या कृतीवर टीका होत आहे. माजी मंत्री थोरात यांनी देखील या विषयावरून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. ते म्हणाले, मी अजूनपर्यंत कोणाला हात दाखवलेला नाही. मी परमेश्वराच्या तत्त्वाला मानतो. संकट समोर आल्यावर किंवा आत्मविश्वास डगमगल्यानंतर असे उद्योग सुरू होता. काम नाही केलं आणि फक्त हात दाखवत फिरले तर जनता नक्कीच हात दाखवते.



निसर्गामध्ये कुठलीतरी शक्ती आहे त्याला मी परमेश्वर मानतो
निसर्गामध्ये कुठलीतरी शक्ती आहे त्याला मी परमेश्वर मानतो. सगळ्यांचा परमेश्वर एकच आहे. तपास यंत्रणांच्या कारवाई संदर्भात बोलताना ते म्हणाले, राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा उपयोग होत आहे ही बाब आता सर्वसामान्यांना समजू लागले असून, स्वायत्त संस्थांनी देशात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने राजकारणासाठी या संस्थांचा उपयोग होत आहे. विरोधात कोणी बोलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या संस्थांचा उपयोग केला जातो. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे उदाहरण देताना त्यांनी आरोप केला.
महागाई, बेरोजगारी आणि महाराष्ट्राच्या मानबिंदूवर आघात करण्याचा सातत्याने प्रयत्न
सध्या देशात महागाई व बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे अशा प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी भाजपचे नेते वेगळे प्रयोग करत असतात. कोणी महाराष्ट्र कर्नाटकचा जुना प्रश्न उकरून काढतात, राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतात, या माध्यमातून भाजपचे नेते महाराष्ट्राच्या मानबिंदूवर आघात करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, असा आरोप थोरात यांनी केला.