Pune : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अवमान प्रकरणी विश्रांतवाडीत आंदोलन

दोषीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी केले पोलीस ठाण्यात “ठिय्या आंदोलन”, लेखी आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे!!!
पुणे – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विश्रांतवाडी येथे फुले-शाहू- आंबेडकरी विचारधारेच्या संस्था संघटना व कार्यकर्ते यांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या निषेध मोर्चाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून शिवसेना उपनेत्या व आंबेडकरी विचारवंत सुषमा अंधारे, आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते.

सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी या व्यक्तीवर देशद्रोहाचा तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी उपस्थितांच्या वतीने करण्यात आली. राकेश तिवारी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. देशाच्या सर न्यायाधीश या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या अवमान प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी पायी घोषणा बाजी करत थेट विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशन आवारात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांकडे हात जोडून विनंती केली. गुन्हा दाखल करता येणार नाही आपण निवेदन द्यावे, असे यावेळी पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी सांगितले.



विश्रांतवाडी पोलिसांनी तक्रार दाखल करून ती पुढील तपासासाठी वर्ग करण्यात यावी अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांची होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून त्यावर पोलिसांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली. यावेळी आंदोलक व पोलीस यांच्यामध्ये खडाजंगी झाल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लेखी आश्वासन दिल्यानंतर निषेध आंदोलन थांबविण्यात आले.



यावेळी विश्रांतवाडी सह परिसरातील विविध फुले -शाहू -आंबेडकरी विचारधारेच्या सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड व सचिन भोसले यांनी केले. माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक सागर माळकर, भैयासाहेब जाधव, ऍड. अयुब शेख, ऍड. नानासाहेब नलावडे, डॉ.पवन सोनवणे, सुदर्शन चखाले, अझहर खान, सुभाष ठोकळे, कैलास गोंधळे, फय्याज पाशा, महेश पाटील, उल्का घोगरे, शिवानी माने, सारिका मुंढावरे, सिमा डिसोझा, ऋषिकेश चव्हाण,सनी राव, हितेश पाटोळे उपस्थित होते.









