कोविड योध्दयांचा कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने सन्मान

कोथरुड : कोविड १९ वर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेतील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्याचे सर्वांनीच पाहिले. या कोविड योध्दयांचा कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम व वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कोविड काळात अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कार्याचा गौरव व्हायला हवा म्हणून कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण २३५ कोविड योध्दयांना “कोविड योध्दा सन्मानपत्र” देऊन सन्मानित करण्यात आले.
कोविडच्या संकटकालीन परिस्थितीत जनता घरात सुरक्षित होती. कोविड रुग्णांना वाचवण्यासाठी जीवाची परवा न करता सफाई कामगार, पोलीस शिपाई दवाखान्यात कोविड रुग्णांना वाचवण्यासाठी डाॅक्टर, आया, नर्स, प्राणपणाने लढत होते. कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी टीम तयार केल्या व कोथरुड मधील कोविड आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पीएमपीएमएलचे व शिक्षण विभागातील कर्मचारी यांना बरोबर घेऊन कामकाजाचे योग्य नियोजन त्यांनी केले.

वाहक म्हणून काम पहाणारे नागेश गायकवाड व मिलींद आलाटे यांच्यावर संपूर्ण कोविड स्वॅब सेंटर व अॅन्टीजेन केंद्रावर रुग्णांची तपासणी करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती ती जबाबदारी दोघांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पार पाडली. तसेच आरोग्य खात्यातील वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड उपनगरातील झोपडपट्टीतील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य निरिक्षक, मोकादम व काही सेवक यांचे पथक तयार करून आहोरात्र झटून कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या नागरिकांना शोधून तपासण्या करून घेण्यात आल्या . कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न झाले.



सदर कार्यक्रम क्षेत्रिय कार्यालयात प्रभाग समिती हाॅलमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैजीनाथ गायकवाड यांनी केले व सुत्रसंचलन नागेश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास डाॅ. साबळे, आरोग्य निरिक्षक,मुकादम व पीएमपीएमएलचे कैलास डोंगरे,आत्माराम वाल्हेकर, सुभाष पवार, मनोज आयनोर, गणेश कदम, मारोती रावडे, काकासाहेब घुले उपस्थित होते.



