वारजे जुना जकात नाका येथे एलएनटीच्या खोदकामामुळे अपघाताचा धोका..

कर्वेनगर : वारजे जुना जकाता नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू असलेल्या एलएनटीच्या कामामुळे वाहनचालकांचे घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे याठिकाणी केलेले खोदकाम तातडीने बुजवून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ एलएनटी कंपनीकडून जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. परंतु लेन्स कार्ट समोर काम होऊनही गेले काही दिवस होऊन गेले तरी खोदलेला खड्डा व्यवस्थित बुजवण्यात आलेला नाही. मूळ रस्ता केलेले काम यात वरखाली अंतर राहिले असल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात घडत असले तरी पालिका प्रशासन मात्र याकडे दर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रमोद शिंदे यांनी केला आहे.
महापालिकेच्या ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणेचा नागरिकांनाच मनस्ताप
याबाबत नागरिकांकडून ऑनलाईन तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र तक्रार निवारण होण्याआधीच महापालिकेच्या संकेतस्थळावर तक्रार क्लोज करण्यात आली. महापालिकेतून फीडबॅकसाठी जेव्हा संबधित तक्रारदाराला संपर्क साधण्यात आला त्यावेळी काम झाले नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. त्यावर महापालिकेकडून एका अधिकाऱ्याचा नंबर देऊन त्यांना संपर्क साधा असे सांगण्यात आले. या अधिकाऱ्याला संपर्क साधल्यानंतर त्यांनी हा विषय पाणी पुरवठ्याचा असे सांगून कॉल कट केला व पाणी पुरवठ्याचा नंबर पाठवला. म्हणजे महापालिकेची ऑनलाईन तक्रार यंत्रणा केवळ नावाला असून या तक्रार देणाऱ्या नागरिकांनाच मनस्ताप दिला जात असल्याचे दिसत आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अंत्यत रहदारीचा असून या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने येथील रस्त्यावर खोदकाम व्यवस्थित बुजवून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी प्रमोद शिंदे यांनी केली आहे.









