देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवारांच्या आवाहनाला उत्तर..

मुंबई : शरद पवार sharad pawar यांनी केलेले आवाहन बरोबर आहे. त्याचा अर्थ असा घेतला पाहिजे की नैसर्गिक आपत्ती आलेल्या ठिकाणी सुरू असलेले मदत कार्य, रेस्क्यू आपल्यामुळे थांबता कामा नये, त्यामुळे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेते या नात्याने आपले जे काही दौरे आहेत ते आपण करणार आहोत. कारण आम्ही गेल्यानंतर यंत्रणा जागी होते, तसेच आम्हाला जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारकडे मांडता येतात असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी म्हंटले आहे.
नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्या ठिकाणी मदत कार्य पोहोचणं गरजेचं असतं त्यामुळे या भागात होणाऱ्या राजकीय दौऱ्यामुळे तेथील यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते ते योग्य नाही, त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा टाळावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा सल्ला योग्य असल्याचे म्हंटले आहे.

शरद पवारांचा सल्ला योग्य असला तरी आपण दौरा मात्र सुरूच ठेवणार आहे. राजकीय दौरा करत असताना मदत कार्यात असणाऱ्या शासकीय यंत्रणेवर ताण येऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे. मी विरोधी पक्ष नेता आहे. ज्यावेळेस आम्ही दौऱ्याला जातो त्यावेळी त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा फारशी नसते कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे, पण विरोधी पक्ष नेता या नात्याने आमचे गरजेचे आहेत कारण आम्ही गेल्यानंतर शासकीय यंत्रणा जागी होते आणि लोकांचा आक्रोश आम्हाला समजावून घेऊन तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे ठरलेले दौरे मी पुढील ३ दिवसात करणारच आहे.









