कोथरूड मध्ये ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता मोहिम….!

कोथरूड : कोथरुडमध्ये ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने ऐतिहासिक वास्तूंच्या स्वच्छता मोहिमेचा एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सदर उपक्रमाचे नियोजन प्रभाग क्रमांक १२ डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठीच्या वतीने करण्यात आले होते.
या उपक्रमामध्ये मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. गांधी भवन स्मारक व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२२” च्या अनुषंगाने हा उपक्रम घेण्यात आला.
कोथरुड मधील स्मृतीवन हा डोंगर कोथरूड उपनगराला लाभलेला नैसर्गिक ठेवा आहे. या परिसरात टेकडीवर दररोज हजारो नागरिक व्यायामासाठी येत असतात. या टेकडीवर पडलेले कागद, प्लास्टिक व पाण्याच्या बॉटल असा कचरा या मोहिमेत साफ करण्यात आला. मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रा.बागुल व राठोड सर, महानगरपालिकेची स्वच्छता कर्मचारी व नागरिक यांनी यात सहभाग घेतला.

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी व अहिंसेची, स्वच्छतेचा संदेश देणारे महान विभूती मोहनदास करमचंद गांधी यांच्या नावाने गांधी भवन स्मारक हे एक ऐतिहासिक वास्तू कोथरूड उपनगरात आहे. महात्मा गांधी या ठिकाणी काही दिवस वास्तव्यास होते. या वास्तूमधून गांधीजींच्या विचारला अनुसरून स्वदेशी वस्तूंचा वापर, अहिंसात्मक धोरण व सार्वजनिक स्वच्छता याविषयीच्या विचारसरणीचा प्रसार केला जातो. अशा या ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा जतन करण्यासाठी गांधी भवन स्मारकचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी व त्यांचे सर्व कर्मचारी व अधिकारी प्रयत्न करत आहेत.



आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, मोकादम वैजिनाथ गायकवाड यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची साफसफाई करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गांधी भवन परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर कार्यक्रम महापालिका आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार, सचिन लोकरे यांच्या निरीक्षणाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमात विठ्ठल सांभारे, संतोष शिंदे, सुरेश गायकवाड रोहिणी कांबळे, आरती देशपांडे,मनीषा शुक्ल, पुणे महानगरपालिकेच्या मंडाबाई जानराव, वृंदावनी वाघमारे, मंगल कदम, किरण तुसाम, राजू सकट, दत्ता कांबळे, राहुल लोखंडे, रितेश तुसाम इत्यादी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम आयोजित करण्यात मोकादम वैजीनाथ गायकवाड व आण्णा ढावरे यांनी परिश्रम घेतले.



