पुणे शहर

कर्वेनगरमधील मराठवाडा कॉलेजमधील कोविड सेंटर बंद करू नका.

मराठवाडा मधील कोविड सेंटर बंद होऊ नये यासाठी प्रयत्न करणार : धुमाळ

कर्वेनगर : कर्वेनगर येथील मराठवाडा कॉलेज मधील कोविड सेंटर बंद करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची चर्चा ही सर्वत्र सुरू आहे. परंतु कर्वेनगर, कोथरुड, वारजे, शिवणे, उत्तमनगर या भागातील नागरिकांसाठी हे सेंटर सोयीचे असल्याने ते बंद करण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येऊ लागली आहे.

कोविडचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर कर्वेनगर मधील मराठवाडा कॉलेज मध्ये महापालिकेच्या वतीने कोविड केंद्र व विलगिकरण कक्ष चालू करण्यात आला होता. या केंद्रात रुग्णांवर प्राथमिक स्वरूपात उपचार ही केले जातात त्यासाठी डॉक्टरांची देखील या ठिकाणी नेमणूक आहे. हजारो रुग्ण या केंद्रात बरे होऊन घरी गेले आहेत. मग रुग्ण संख्या वाढत असताना हे केंद्र बंद का केले जात आहे. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

या संदर्भात विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी सांगितले की हे सेंटर बंद करणे म्हणजे या भागातील नागरिकांची गैरसोय करण्यासारखे आहे. या सेंटरमुळे  कर्वेनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे या भागातील सर्वसामान्य नागरिकांची आतापर्यंत खूप चांगली सोय झाली आहे. आता रुग्ण संख्या वाढत आहे. शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत देखील नवीन रुग्ण सापडत आहेत. सोसायटी पातळीवर अँटीजन रॅपिड टेस्ट सुरू आहेत त्यातही रुग्ण सापडत आहेत.  हे सेंटर बंद केले तर या परिसरातील रुग्णांना बाणेर बालेवाडी किंवा सिंहगड कॉलेज मधील विलगीकरण सेंटरला पाठवावे लागेल आणि ते येथील नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरणार आहे. आताही या केंद्रामध्ये दोनशे ते अडीचशे नागरिकांवर उपचार सुरू आहेत. मराठवाडा मधील हे कोविड सेंटर बंद होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये