आरोग्य

अतिरेक हँड सॅनिटायझेशनचा- डाॅ. सचिन नागापूरकर

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी लोकांकडून स्वच्छता बाळगणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम देखील पाळले जात आहे. शिवाय, कोरोना व्हायरसपासून (Covid-19) संरक्षण व्हावं यासाठी हँड सॅनिटायझरचाही प्रचंड प्रमाणात वापर केला जात आहे. अधिक सावधगिरी बाळगण्यासाठी लोक थोड्या-थोड्या अंतरानं सॅनिटायझरचा उपयोग करून हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक ठिकाणी साबण – पाण्यानं हात स्वच्छ धुणे अशक्य आहे. यामुळे खबरदारी म्हणून हँड सॅनिटायझरचा वारंवार वापर होत आहे. आपल्याला हँड सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला सरकारकडूनच देण्यात आला आहे. पण याचा नियमित प्रमाणापेक्षा जास्त उपयोग केल्यास आरोग्यावर दुष्परिणाम (Side Effects Of Hand Sanitizer) देखील होऊ शकतात.
सूक्ष्म जीवजंतूंचा खात्मा करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणं प्रचंड उपयुक्त ठरते आणि यामुळेच कोणत्याही आजारांचा संसर्ग होण्यापासून आपलं संरक्षण होतं. पण याची एक दुसरी बाजू देखील आहे. सॅनिटायझरमधील घटकांमुळे आपल्या शरीरात असलेल्या निरोगी बॅक्टेरियांवरही (Microbiomes) वाईट परिणाम होऊ शकतो. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही. जे बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी लाभदायक आहेत, सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे ते देखील नष्ट होतात. खबरदारी म्हणून हात स्वच्छ धुण्यासाठी साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यासच सॅनिटायझरचा वापर करावा.
सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे हँड सॅनिटायझेशनचा अती वापरमुळे ते हातामधून तोंडामध्ये जाण्याची भीती आहे. लहान मुलांनी हे हँड सॅनिटायझर व्यवस्थित न वापरले तर ते तोंडामध्ये जाण्याची शक्यता जास्त असते.

हात धुण्याची पद्धत

साधारणपणे जी मंडळी बऱ्यापैकी घरीच असतात ,फारशी घरा बाहेर पडत नाही अशा मंडळींनी साधे पाणी व साबण ह्यांच्या साहाय्याने हात धुतले तरी खुप झाले. जी मंडळी काम निमित्ताने घरा बाहेर पडत आहे अश्या लोकांनी घरात आल्यानंतर लगेच हात,पाय स्वच्छ धुवुन (पाणी व साबण ह्यांच्या साहाय्याने) तरी खुप आहे.
शक्यतो बाहेर गेले असता जिकडे साबण,पाणी पुरेसे उपलब्ध नसते अशा ठीकाणी हँड सॅनिटायझेशनचा वापर करण्यास हरकत नाही.

साधारणपणे हँड सॅनिटायझेशनचा वापर करताना ते शक्यतो चांगल्या कंपनीचे आहे की नाही ह्याची खात्री करून घेतली पाहिजे. आज बाजारात उपलब्ध असणारी बरीच हँड सॅनिटायझर ही फसवी असण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी ही अशी फसवी हँड सॅनिटायझर्स बनवताना धाडी टाकण्यात आल्या अशा बातम्या आहेत.
हँड सॅनिटायझेशनचा वापर योग्य त्या पद्धतीने केला पाहिजे. ते हातात घेतल्यानंतर साधारणपणे 5 ते 10 सेकंद हातावर चोळले पाहिजे. व त्यामुळे ते सुकून हात ड्राय झाला पाहिजे.

साबणाने हात धूत असताना ज्या पद्धतीने आम्ही डाॅक्टर मंडळी ऑपरेशन पुर्वी हात साफ करतो त्या पद्धतीने जर आपण त्याची सवय लावली तर नक्कीच हँड सॅनिटायझेशनचा वापर करण्याची फारशी गरज भासणार नाही.  हातात साबण घेऊन…हाताचा तळवा,दोन बोटांमधील जागा, नखाचा भाग, हाताचा मागील भाग, मनगट, फोरआर्मचा भाग, कोपरा जर आपण दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ केला तर निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि इतर वेळी जर आपण कोठे बाहेर पडलो, गर्दी मध्ये जावून आलो, दवाखान्यात काही कारणास्तव जावे लागले तर घरी आल्यानंतर परत एकदा आपण ह्याच पद्धतीने हात साबणाने साफ केला पाहिजे.

आपल्याला आता कोरोना व्हायरस सोबतच जगायचे आहे. त्या कोरोना व्हायरस वर विजय मिळवायचाच असेल तर आपल्याला काही गोष्टी बदलावयाच्या आहेत.जसे सोशल डिस्टंसींग पाळणे,मास्क चा वापर करणे,हात स्वच्छ धुत राहणे.कोणत्याही प्रकारचा त्रास जसे की ताप, खोकला झाल्यास तात्काळ वैद्यकीय तपासणी करून सल्ला घेणे आवश्यक आहे.  गरजे नुसारच हँड सॅनिटायझेशनचा वापर करणे. शक्यतो साबण/ पाणी हात धूण्यासाठी वापरणे.
तसेही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक/अति वापर वाईटच.

चला पण ह्या कोरोना व्हायरस विश्वमाहामारी आजाराच्या मुळे आपल्या कडे सर्व सामान्य जनतेला स्वच्छतेचे मह्त्व पटले आहे. हात धुणे, वारंवार अंग स्वच्छ करणे, समाजात फिरताना मास्क अथवा रूमाल वापरणे, शिंकताना काळजी घेणे, खोकलताना काळजी घेणे, आजारी व्यक्ती असेल तर त्याचा संपर्क शक्यतो टाळणे. कोणताही आजार अंगावर न काढता लवकरात लवकर वैद्यकीय तपासणी व सल्ला घेणे.  रस्त्यावर विनाकारण गर्दी करणे टाळणे, रस्त्यावर थुंकणे हे किती घातक आहे हे ही आज आपल्याला समजले… चला कोरोना व्हायरस वर विजय मिळवायचाच आहे परंतु व्यक्तिगत पातळीवर उपाययोजना/स्वच्छता पाळून आपले स्वतःचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

डाॅ. सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ
हर्डीकर हाॅस्पीटल
पुणे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये