पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा : शिवसंग्राम संघटनेची मागणी

पुणे : जळगांव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल व विशेषतः स्त्रियांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यांची तशी ऑडियो क्लिप समाज माध्यमांत प्रसारित झाली आहे. सदरच्या क्लिप द्वारे मराठा समाजाचा, स्त्रियांचा अपमान झाला असल्याने मराठा समाजात त्याबाबत तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराची दखल घेऊन बकाले यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पुणे शहर शिवसंग्राम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी हेमंत खराडे यांना देण्यात आले असून त्याची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली आहे. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश सचिव शेखर पवार, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष कल्याण अडागळे, महिला शहराध्यक्षा कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राला उच्च सामाजिक परंपरेची पार्श्वभूमी आहे. मानवी मूल्ये, सामाजिक सौहार्दता, परस्पर विश्वास आणि सामाजिक सलोखा महाराष्ट्राचे वैशिष्ट्य राहिले आहे. परंतु अलीकडे काही समजद्रोही तत्त्वांकडून महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणण्याचे, महाराष्ट्राची सामाजिक एकता, सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न वारंवार सुरू असल्याचे दिसून येत असून जळगांव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे वक्तव्य त्याचाच प्रकार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. समाजमन दूषित होऊन महाराष्ट्रात जातिजातित भांडणे लावणे, पर्यायाने आपसात संघर्ष होऊन सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे, एकमेकांत अविश्वास वाढीला लागणे यांसारखे दुष्परिणाम याद्वारे संभवतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
शिवसंग्राम, ही एक सामाजिक संघटना असून सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. आमचे दिवंगत नेते स्व. विनायकराव मेटे यांनी आयुष्यभर ज्या मूल्यांवर वाटचाल केली त्याचे जतन, संवर्धन करण्याचे सातत्याने प्रयत्न करत असते.

ही सर्व परिस्थिती पहाता महाराष्ट्रातील सामाजिक समीकरण, सौहार्दता टिकवायची असेल, तर अशा समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने कडक कारवाई होणे आवश्यक आहे. जेणेकरून हे सरकार लोकभावनांचा आदर करते, जनसामान्यांच्या या सरकार कडून असलेल्या अपेक्षांची कदर करत असल्याचाही चांगला संदेश समाजात जाईल. यादृष्टीने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध केलेली निलंबनाची कारवाई ही अपुरी असून त्यांच्याविरुध्द सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे, सामाजिक सलोखा धोक्यात आणणे, एका जातिविशिष्टाचा अपमान करणे, स्त्रियांविरुद्ध आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी करणे, इ. साठी त्यासंबंधीच्या भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांआधारे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जावी त्याचप्रमाणे त्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ केले जावे अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे कार्यरत असताना त्यांनी मराठा तरुणांवर द्वेषभावनेने दाखल केलेल्या गुन्ह्यांची खातेनिहाय निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.