
पुणे : येत्या एक दोन महिन्यात पुणे महापालिकेची निवडणूक होईल. अनिश्चिततेसाठी ही निवडणूक इच्छुकांच्या लक्षात राहील. कोथरुडकरांसाठी या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय असे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा चंद्रकांत पाटील निवडून आले.विधानसभेची पहिली निवडणूक २०१९ साली पाटील यांनी कोथरुड मधून लढविली. त्यावेळी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री होते. त्यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे असे तीन पक्ष एकत्र आले होते. अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीत पाटील यांना लढतीत सामोरे जावे लागले. कदाचित त्यातून पाटील यांना कोथरुडचे राजकीय अंतरंग कळले असावे, असे म्हणता येईल.

आता चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा राजकीय परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. एक तर प्रदेशाध्यक्ष या नात्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकांमध्ये बहुमत राखण्याची पदसिद्ध जबाबदारी पाटील यांच्यावर आहेच. शिवाय कोथरुड मध्ये भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून शहराच्या एकूण नगरसेवक संख्येत भर घालायचे कामही पाटील यांना आमदार म्हणून करायचे आहे, अशा दुहेरी जबाबदाऱ्या पाटील यांना पार पाडायच्या आहेत. महापालिकेची निवडणूक २०१७ साली झाली आणि पाटील २०१९ साली आमदार झाले. त्यामुळे पाटील यांच्यासाठी आगामी महापालिका निवडणूक ही पहिलीच असणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या आघाडीशी पाटील यांना सामना करावा लागेल. गेल्या दोन, अडीच वर्षांत मतदारसंघात आपला संपर्क किती आहे याची पोचपावती यानिमित्ताने पाटील यांना मिळणार आहे आणि आगामी विधानसभेसाठी काही हिंट्सही पाटील यांना मिळतील. पाटील मूळचे कोल्हापूरचे, त्यांचा पुण्याशी संबंध काय? असा प्रचार त्यांच्या विरोधात होत होता त्याला उत्तर देण्यासाठी पाटील यांनी कोथरुड मध्येच वास्तव्य केले आहे. वास्तव्याला आलेल्या पाटील यांना कोथरुडकरांनी किती स्वीकारलं आहे हे समजण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक रंजक ठरणार आहे.






