ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; कोथरूड मतदार संघाचा उमेदवार जाहीर करायला का उशीर होतोय ?

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मात्र पुण्यातील मतदार संघाचा समावेश करण्यात आलेला नाही. आजच्या यादीत कोथरूड मतदार संघाचा उमेदवार जाहीर केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु कोथरूड चा उमेदवार जाहीर न झाल्याने उमेदवाराबाबतची उत्कंठा आणखी ताणली गेली आहे. आजच्या यादीत ६५ मतदार संघाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
कोथरूड मध्ये भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शिवसेना वेळ घेत आहे. पाटील यांच्या समोर तगडं आव्हान या मतदार संघात निर्माण करण्यासाठी सर्व राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीने पाठिंबा दिलेल्या मनसेच्या उमेदवाराने चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मोठा आव्हान उभा केले होते. त्यावेळी शिवसेना महायुतीत होती व त्याचा फायदा पाटील यांना झाला होता, त्यामुळे महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार दिल्यास हा मतदार संघ खेचून घेण्यात यश मिळू शकते असा विश्वास वाटत असल्याने उमेदवार जाहीर घेण्यास वेळ घेतला जात असल्याचे दिसत आहे.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व माजी नगरसेवक, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आजच्या यादीत कोथरूड मतदार संघातील उमेदवाराचे नाव जाहीर होईल असे वाटत होते पण तसे झाले नाही. त्यामुळे कोथरूडचा उमेदवार कधी जाहीर होणार हे पाहावे लागणार आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)उमेदवारांची यादी






















