पुणे शहर

महाराष्ट्रात प्रथमच पुण्यातील बावधन मध्ये विविध क्षेत्रातील महिलांनी एकत्र येत स्थापन केला ‘सिद्धीचा गणपती’

पुणे : पुण्यातील बावधन मध्ये यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक नवीन आदर्श समाजासमोर मांडला गेलाय. या परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत “सिद्धीचा गणपती” स्थापन केला असून यामुळे महिला शक्ती एकत्रीकरणाचे दर्शन होत आहे. महिलांनी एकत्र येत स्थापन केलेल्या गणपतीचे महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.

बावधन मधील सुर्यदत्ता कॉलेज समोरील ग्राऊंड (आठवडी बाजार ग्राऊंड) येथे बावधनच्या माजी सरपंच पीयुषा किरण दगडे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिद्धीचा गणपती’ स्थापन करण्यात आला आहे. सध्या महिलांनी स्थापन केलेल्या या सिद्धीच्या गणपतीची चर्चा पुण्यात सर्वत्र सुरू आहे.

असं म्हणतात, स्त्री ही अष्टावधानी असते. तिच्या डोक्यात असंख्य विचार एकाच वेळी चालू असतात. ती सजग असते, संयमी असते आणि तितकीच नाजूकही असते. परंतु योग्य वेळी ती स्वतःच्या माणसांसाठी झाशीची राणी देखील असते. हे तर सर्व आपण वाचत आलो आहोतच. पण आजची स्त्री याही पुढे जाऊन स्वतःसाठी उभं राहायला शिकतेय.
इतिहासात अशा कणखर स्त्रियांची अनेक चरित्र आपण वाचली आहेत. पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया देखील कुठेही कमी नाहीत. मग ती गृहिणी असो, नोकरी करणारी असो वा व्यावसायिक..!! आणि अशाच सर्व गुणांनी सिद्ध असलेल्या स्त्रियांनी एकत्र येऊन पुण्यात बावधन मध्ये “सिद्धीचा गणपती” बसवला आहे. यामध्ये गणपतीची मिरवणूक, प्रतिष्ठापना, पूजा, देखावे, प्रसाद हे सर्व महिलांनी केले असून विसर्जनाचे नियोजन देखील त्यांनीच केले आहे.

महिलांनी महिलांसाठी बसवलेला हा गणपती स्त्री शक्तीचं रूप दाखवत आहे. सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवतोय का काय असं चित्र आहे. हे सगळं मोडून समाजाने पुन्हा एकदा आदर्श गणेशोत्सवाची कास धरायला हवी हे तितकंच खरं आहे, परंतु ह्याची सुरुवात करायला सगळ्या महिला पुढे सरसावल्या आहेत हे विशेष आहे. पहिल्याच दिवशी गणरायाची वाजतगाजत शिस्तबध्द मिरवणूक काढत महिलांनी आपल्या कार्य कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे. दहा दिवस विविध संस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच विविध स्पर्धांचे नियोजनही महिलांनी केले आहे.

उत्तम देखावा, अत्युत्तम कार्यक्रम या बरोबर महिलांनी महिलांची ओळख वाढवून एकमेकींना आधार द्यावा, एकमेकांचा उत्साह वाढवावा, व्यवसायाला हातभार लागावेत, इतकंच नाही तर नवीन पिढी समोर उत्तम आदर्श ठेवावेत हा हेतू “सिद्धीचा गणपती” बसवण्यामागे असल्याचे बावधनच्या माजी सरपंच पीयुषा किरण दगडे पाटील यांनी सिंहासन न्यूजशी बोलताना सांगितले.

Img 20230717 wa0012281291948762095496285435
Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20230812 wa0001281297517832967883010071
Img 20230920 wa00037367904631585549378

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये