पुणे जिल्हा

बनावट आधार कार्ड बनवून केले दोघांशी लग्न ; तरुणीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे : तरुणीचे बनावट आधारकार्ड तयार करून तिचे दोन तरुणांशी लग्न लावून देत फसवणूक करण्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी तरुणीसह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खेड तालुक्यातील आळंदी येथील पोपळे मंगल कार्यालय आणि वाघोली येथे गुरुवारी (दि. ४) हा प्रकार घडला. राहुल दशरथ कणसे (३७, रा. त्रिवेणीनगर, तळवडे, मूळ रा. भांडवली, ता. माण, जि. सातारा) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ज्योती रवींद्र पाटील उर्फ ज्योती धनंजय लोंढे, भावेश रवींद्र पाटील, ज्योती पाटीलचे आई-वडील आणि त्यांची मुलगी निशा दत्ताराम लोखंडे (रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) कलम ३१८ (२), ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगनमत करून मुलगी निशा लाखंडे हिचे चैतन्य खांडे यांच्यासोबत लग्न लावून देऊन चैतन्य यांच्याकडून पैसे घेतले. तसेच निशा हिचे बनावट आधारकार्ड तयार करून त्याच्या आधारे फिर्यादी राहुल कणसे यांना तिचे नाव निशा दत्ताराम पाटील असल्याचे भासवले. त्यानंतर फिर्यादी राहुल यांचा भाऊ सुनील कणसे यांच्यासोबत निशा हिचे लग्न लावून दिले. त्यासाठी फिर्यादी राहुल यांच्याकडून एक लाख ५५ हजार रोख तर ९५ हजार भावेश रवींद्र पाटील याच्या खात्यावर स्वीकारले. यात संशयितांनी संगनमत करून तोतयेगिरी करून २ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये