दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतीत जनसामान्यांमध्ये वाढता रोष : १० लाख भरले नाहीत ॲडमिट केले नाही..गर्भवती महिलेचा मृत्यू

पुणे : पुण्यातील नामांकित रुग्णालय प्रशासनाने केलेला एक भयंकर प्रकार समोर आला असून या रुग्णालयाच्या बाबतीत जनमानसात रोष वाढताना दिसत असून त्याचे पडसाद समाज माध्यमाच्या माध्यमातून पुढे येऊ लागले आहे. या प्रकरणात आता रुग्णालय प्रशासनाची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देखील गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांच्या आरोपांमुळे आता खळबळ उडाली आहे.

ज्या महिलेचा मृत्यू झाला ती आमदार गोरखे यांचे पीए संतोष भिसे यांची पत्नी होती. तनिषा सुशांत भिसे असं या मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचं नाव आहे. तनिषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी दिनानाथ रुग्णालयानं 10 लाखांची मागणी केली होती. कुटुंब अडीच लाख भरण्यासाठी तयार असताना देखील या महिलेला ॲडमिट करण्यात आलं नाही. रुग्णाची अवस्था सिरिअस असताना देखील रुग्णालयानं त्यांना ॲडमिट केलं नाही, असा आरोप गोरखे यांनी केला आहे. आपन या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत उचलणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दीनानाथ रुग्णालयाने पैशांअभावी ॲडमिट करून न घेतल्याने तनिषा सुशांत भिसे दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारास उशीर झाल्याने दोन जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना वेळीच ॲडमीट करून उपचार दिले असते तर त्याचे प्राण वाचले असते असे आता बोलले जात असून या रुग्णालयाच्या विरोधात आता जनता आक्रमक होताना दिसत आहे. रुग्णालयाच्या कारभारविरोधात आता सर्वसामान्यांमध्ये रोष वाढताना दिसत आहे. या दीनानाथ रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करून रुग्णालय धर्मदाय आयुक्त कार्यालयाने ताब्यात घ्यावे अशा पोस्ट आता समाज माध्यमावर पडू लागल्या आहेत. या रुग्णालयाला सरकारने जागा दिली. त्यांना अनेक करांमध्ये सूट दिली जाते. धर्मादाय आयुक्त कार्यालया अंतर्गत रुग्णालयाची नोंद आहे. असे असताना रुग्णालय केवळ पैसे कमावण्याच्या मागे लागले आहे का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
या धक्कादायक प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार या रुग्णालयावर काय कारवाई करणार हे आता पाहावे लागणार आहे.


