आरोग्य

उष्माघात एक आपात्कालीन वैद्यकीय आजार ; लक्षणे, उपचार आणि काळजी..

पुणे : खारघर येथे एका कार्यक्रमा दरम्यान उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत वाईट घटना घडली. या घटनेमुळे सर्वांचेच मन हेलावून गेले. चूक कोणाची ते काही दिवसांनी समजेल, पण गेलेली व्यक्ती परत येणे नाही. आता त्यांच्या फक्त आठवणी राहणार हेच सत्य..

उष्माघात हा खरंच एक आपात्कालीन वैद्यकीय आजार आहे हे परत एकदा सिद्ध झाले. हल्लीच्या काळात सर्व सामान्य माणसं उन्हाळ्यात तापमान खूप प्रमाणात असल्याने उन्हात कामे करणे, उन्हात‌ फिरणे असे करताना फारसे दिसत नाही. उन्हात काम करायचे झाल्यास योग्य ती काळजी घेऊनच कामे करताना अनेक जण दिसतात. त्यामुळे उष्माघाताचे रूग्ण फारसे बघायला मिळत नाहीत.

आज बरेच डॉक्टर असे असतील त्यांनी त्यांच्या दहा एक वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायात उष्माघाताचा रूग्ण तपासला असेल अथवा त्याला उपचार दिले असतील. पण हा उष्माघाताचा आजार खरंच एक आपात्कालीन वैद्यकीय आजार आहे हे मात्र नक्की.

उष्माघाताची कारणे
उष्मघाताचे मुख्य कारण म्हणजे खुप प्रमाणात तापमानात झालेली वाढ, अचानक वाढलेले तापमान, थंड वातावरणातून उष्ण कटिबंधातील प्रदेशात कामानिमित्त येणे, उन्हात काम करणे, जास्त कालावधीसाठी उन्हात फिरणे, पाणी कमी प्रमाणात पिणे, उन्हाळ्यात जास्त प्रमाणात केलेला सावली मधील व्यायाम पण उष्माघात होण्याचे कारण ठरू शकतो. वयस्कर मंडळी, तरुण मंडळी, वजनाने जास्त असणारी मंडळी ही प्रामुख्याने उष्माघाताचे शिकार होतात.

उष्माघाताची लक्षणे
साधारणपणे शरीराचे तापमान ४० अंश अथवा जास्त प्रमाणात वाढणे ( नार्मली ते ३६ ते ३७ अंश असते) तरी उष्माघाताची लक्षणं दिसू लागतात, अचानक सुरू होणारी मळमळ, उलटी, पोटात दुखणे, पायांना गोळे येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा जाणवणे, दम लागणे, चक्कर येणे, बोलताना विसंगती जाणवणे, लघवी बंद होणे.
अशी लक्षणे साधारणपणे दिसू लागतात.

उपचार
वरील पैकी लक्षणे दिसतात लवकरात लवकर अशा रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे, घरगुती उपचार करण्यात फारसा वेळ न दवडता जवळपासच्या दवाखान्यात दाखल करणे, प्राथमिक उपचार सुरू करणे, बहूतांश रूग्ण प्राथमिक उपचारानंतर बरे होतात. काही रूग्णांना मात्र मोठ्या दवाखान्यात आयसीयू मध्ये दाखल करावे लागू शकते. पण अचुक निदान आणि उपचार आणि लवकर उपचार मिळताच रूग्ण बरा होऊ शकतो.
प्रत्येक रूग्णाची प्रतिकारशक्ती वेगळी असते त्यामुळे उपचार आणि उपचारानंतर रूग्णाची सुधारणा वेगवेगळी असते.

काय काळजी घ्यावी
उन्हात काम करताना, उन्हाळ्यात जास्त प्रमाणात प्रवास करताना, उन्हात जास्त कालावधी मध्ये बसून राहताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, छत्री, गमछा, टॉवेल गुंडाळून काम केले पाहिजे. पाणी पित राहणे,सोबत पाणी ठेवणे आवश्यक आहे. कपडे शक्यतो भडक रंगाचे नको. सैल सुती कापड वापरणे, दिवसभराची कामं सकाळी ११ च्या आत अथवा दुपारी ४ नंतर करणे, थंड प्रदेशातून कामानिमित्त जर उष्णकटिबंधीय प्रदेशात कामानिमित्त जायचे असेल तर जास्त प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्याला गॉगल आवश्यक आहे. वातावरणातील बदल आपल्या हातात नाहीत. कधी कडक ऊन तर कधी मुसळधार पाऊस तर कधी उचानक थंड वातावरण.. वातावरणातील बदलला कारणीभूत आपणच आहोत. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने, वाढते प्रदूषण, झाडांची कमी झालेली संख्या, सिमेंटचे जंगल आपणच निर्माण केले आहे. त्यामुळे होणाऱ्या परिणामांना आपल्याला सामोरे जावेच लागणार आहे.

सध्या उन्हाचा तडका खूपच वाढला आहे. पुढील पाच दिवस उष्णतेची लाट अधिक तीव्र होऊन पारा ४४ अंशावर जाईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे आपण आपली, घरातील सदस्यांची, लहान मुलांची काळजी घ्या… बाहेर फिरताना, काम करताना पुरेशी काळजी घ्या, सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत त्यामुळे कोठेही फिरायला जाताना याबाबत जरूर विचार करा. आपली व आपल्या मित्रपरिवाराची काळजी घ्या.

डॉ.सीमा पाटील
डॉ.सचिन नागापूरकर
ओम हॉस्पीटल बावधन

Img 20221126 wa02126927299965323449855 1
बालभारती पौड रस्त्याबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केली महत्वपूर्ण भूमिका

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये