बजेटच कारण देऊन आरोग्य विषयक योजना बंद करत असाल तर आंदोलनाला सामोरे जा ; पृथ्वीराज सुतार यांचा प्रशासनाला इशारा

विक्रम कुमार यांना पृथ्वीराज सुतार यांचं पत्र
पुणे : सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना बजेटच कारण देऊन बंद करण्यात येत असेल तर महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.
या संदर्भातील निवेदन सुतार यांच्याकडून पुणे महापलिका प्रशासक विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. सुतार यांनी सांगितले की, पुणे मनपाच्या अंतर्गत क्रिस्ना डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड मार्फत कोथरूड येथील सुतार हॉस्पिटल व कमला नेहरू हॉस्पिटल येथे दोन डायग्नोस्टिक सेंटर चालविली जातात. या सेंटरमध्ये पुणे मनपाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासणीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जाते. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या काही मोफत तपासण्या केल्या जातात. या योजनेचा लाभ गरजू, गरीब, ज्यांना कसलाही अधार नाही, अशा ज्येष्ठ महिला-पुरुषांना होत आला आहे.
आता १ एप्रिल २०२३ पासुन ही योजना राबवू नये म्हणून क्रिस्ना डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड यांना आरोग्य अधिकारी व सहाय्यक आरोग्य अधिकारी याच्या सहीने एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रामध्ये बजेटमध्ये तरतूद नसल्यामुळे सदर योजना बंद करावी असे म्हंटले आहे. हा प्रकार निश्चितच चुकीचा व अन्यायकारक असल्याचे सुतार यांनी म्हंटले आहे.
मनपाकडून अनावश्यक अशा अनेक कामासाठी बजेटमध्ये कोटयावधी रूपयांची तरतूद केली जाते. परंतु सामान्य नागरिकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी मनपा तरतूद करू शकत नाही हे निश्चितच निषेधार्य आहे. आपण त्वरीत ही योजना चालू करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत व ही योजना चालू करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुतार यांनी दिला आहे.

पृथ्वीराज सुतार यांचा पालिका प्रशासना ला आंदोलनाचा इशारा :



