वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर रस्ता प्रश्नी महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक ; बाधीत जागा मालकांच्या मोबदल्याबाबत सकारात्मक चर्चा.. या दिवशी होणार प्रत्यक्ष पाहणी
पुणे : कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून कर्वेनगर परिसरात येण्यासाठी तसेच वारजे सर्व्हिस रस्त्याला पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर या 24 मीटर रुंद डीपी रस्त्याचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने आज आणखी एक पाऊल पुढे पडले. आज महापालिकेत रस्त्यात बाधीत होत असलेले जागा मालक, पालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात पार पडलेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाला.
आज महापालिकेत माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी नियोजित केलेल्या बैठकीत आठ ते दहा बाधीत जागा मालक, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर , पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे, भास्कर हांडे, भू संपादन विभागाचे राजेंद्र थोरात, अभिषेक घोरपडे आदी उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने हा रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास वारजे सर्व्हिस रस्त्याला तासंन तास होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. सर्व्हिस रस्त्याच्या प्रश्नाबाबत ही आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे.
या बैठकीत बाधीत जागा मालक यांना, एफ एस आय, टी डी आर व रोख स्वरुपात मोबदला देण्याबाबत चर्चा झाली. याबाबत तातडीने येणाऱ्या बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी महापालिकेचे पथ विभागाचे अधिकारी अनिरुध्द पावसकर, जागा मालक, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, भू संपादने अधिकारी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करणार असून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
या रस्त्यात काही घरमालक व जागा मालकांच्या जागा बाधित होत आहेत. या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग येणार त्यामुळे आज महापालिकेत झालेल्या बैठकीला विशेष महत्व आहे. माजी नगरसेवक बाबा धुमाळ व माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, यांच्याकडून सातत्याने या रस्त्याचे काम व्हावे यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे आज या रस्त्याचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पडले आहे.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता हा वारजे, कर्वेनगर, कोथरूड वासियांसाठी महत्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. महामार्गावरून डुक्कर खिंडीतून सरळ तिरुपतीनगर पुढे वारजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्वेनगर व पुढे कोथरूडकडे जाता येणार आहे. यासाठी सर्व्हिस रस्त्याने वारजे हायवे चौकात किंवा चर्च पासून कॅनॉल रस्त्याने येण्याची गरज भासणार नाही. सध्या वारजे सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना तासंतास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही डुक्कर खिंड ते तिरुपती नगर रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच तातडीने हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
या डीपी रस्त्यासाठी प्रशासनाने निधी उपालब्ध करून नव्याने टेंडर काढले आहे. जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घतल्यास लवकरच हा रस्ता पूर्णत्वास येऊन नागरिकांसाठी वापरास खुला होऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला वेग मिळावा यासाठी आज बैठकीचे नियोजन करून त्यावर निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न केला त्यामुळे बुधवारी प्रत्यक्ष पाहणी होणार असून योग्य निर्णय होऊन काम सुरू होईल असे धुमाळ यांनी सांगितले.