बावधन भुसारीमध्ये सुनेत्रा पवारांना मताधिक्य : किरण दगडे पाटील
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकीत बावधनकरांनी सुनेत्रा पवार यांना साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे. बावधन , भुसारी कॉलनी भागात सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतांमध्ये मागे टाकले आहे.
सुनेत्रा पवार यांना प्रचारादरम्यान या भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच बावधन खुर्द व बावधन बुद्रुक या दोन्ही भागातून त्यांना मताधिक्य मिळेल असे बोलले जात होते. आणि तसेच घडल्याचे निकालातून पुढे येत आहे. या भागातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी सोसायटी भागातून सुनेत्रा पवार यांचा नियोजनबध्द प्रचार केल्याने त्यांना या भागातून लीड मिळाल्याचे दिसत आहे. बावधन बुद्रुक व खुर्द असे एकूण ४ हजारांच्या वर व भुसारी कॉलनी मधून ८ हजार ३६ एवढं मताधिक्य पवार यांना मिळाले आहे.
किरण दगडे यांनी प्रचारादरम्यान बावधन परिसरातील सोसायट्यांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहचवली होती. परिसरातील विरोधकांचा विरोध झुगारून त्यांनी सुनेत्रा पवार यांचे सामाजिक काम, महायुतीच्या कामाची माहिती घराघरात पोहचवली त्याचा फायदा या भागात मताधिक्य मिळवण्यासाठी झाल्याचे निकालात दिसत आहे. भुसारी कॉलनी परिसरातही चांगला प्रचार करण्यात आला होता.
किरण दगडे पाटील म्हणाले बावधन व भुसारी कॉलनी परिसरातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. निकालात बावधन व भुसारीतून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळाल्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मात्र सुनेत्रा पवार यांचा विजय झाला असता तर मनाला आणखी समाधान मिळाले असते असे त्यांनी सांगितले.