जालन्यात आवाज जरांगे पाटलांचा,आंतरवाली सराटीत रात्रीपासूनच कार्यकर्ते, लोकांची सभेसाठी गर्दी, यंत्रणाही सज्ज

जालना : मनोज जरांगे पाटील यांनी सरकार दिलेल्या अल्टीमेटमच्या 10 दिवस अगोदर 14 तारखेला म्हणजेच, आज जालन्यातील आंतरवली सराटी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी आज रात्रीपासूनच कार्यकर्ते आणि लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जरांगेंच्या सभेसाठी अयोजकांसोबतच प्रशासन देखील तयार झालं असून या सभेवर खबरदारी म्हणून ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. याव्यतिरिक्त याठिकाणी मेडिकल इमर्जन्सीसाठी 60 रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात येणार आहेत.
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला दिलेली मुदत ही पुढच्या दहा दिवासांमध्ये संपणार आहे. त्याचाच आधी अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. तसेच या सभेची सध्या जय्यत तयारी सुरु करण्यात आलीये. तर 100 एकर वरील मैदान हे सभेसाठी सज्ज झालयं.

मनोज जरांगे यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात सभा आहे. त्यासाठी आज रात्रीपासूनच तिथं गर्दी झाली आहे. अनेक लोक गाड्या घेऊन आंतरवालीत आदल्या दिवशीच आले आहेत. रात्रभर मुक्काम करुन आज सभेला सर्वजण उपस्थिती लावणार आहेत. आजच्या सभेसाठी होणार अलोट गर्दी लक्षात घेत, पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. या 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुदत यावेळी देण्यात आली आहे. तर, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने अंतरवाली सराटी गावात 14 ऑक्टोबरला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्याआधी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा केला.









