कोथरूडमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना पत्ते शोधून पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा ; ठोठावला दंड

कोथरूड : रस्त्यावर, नाल्यामध्ये कचरा फेकणाऱ्या नागरिकांना व्यावसायिकांना कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पडलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून त्यांच्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी संबधित नागरिकांकडून दंड वसूल केला. तसेच महापालिकेच्या नियमांची पूर्तता न करणाऱ्या नवीन सोसायट्यांवरही दंडाचा बडगा उगारण्यात आला.
आरोग्य विभागाच्या वतीने प्रभाग क्रं. १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गांवठाण हजेरी कोठी अंतर्गत “स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण – २०२३ तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षे, माझी माती माझा देश” अन्वये ही कारवाई करण्यात आली. ३५ नागरिकांवर पत्ते शोध मोहिमेद्वारे व १५ नविन सोसायट्यांना नियमांची पूर्तता न केल्याने दंड ठोठावण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम तसेच परिमंडळ २ चे उपायुक्त संतोष वारुळे, कोथरूड बावधन क्षेत्रिच कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १०,११,१२ या तीनही प्रभागात “पत्ते शोध माहिम पथक” स्थापन करण्यात आले. सदर पथकात एक आरोग्य निरिक्षक, मोकादम व तीन सेवक यांचा समावेश करण्यात आला आहे.

या पथकाच्या माध्यमातून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणूकर कॉलनी व कोथरूड गांवठाण या दोन आरोग्य कोठ्यांवर गतीमान कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, स्मृतीवन परिसर, कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या मागील रस्त्यावर तसेच गोपीनाथ नगर, सहजानंद व कुमार परिसर व कोथरूड गांवठाण परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकून अस्वच्छ करणाऱ्या तब्बल ३५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ५०,७००/- रुपये दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले आहे.
सदर भागात काम करणारे आरोग्य निरिक्षक करण कुंभार व सचिन लोहकरे मोकादम वैजीनाथ गायकवाड व आण्णा ढावरे यांनी सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकून अस्वच्छ करणाऱ्या कचरा फेकू सम्राटांना जबरदस्त धडा शिकवला आहे. डहाणूकर कॉलनी व कोथरूड गांवठाण परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सोसायट्यांना परवानगी देताना महानगरपालिकेने त्या विकसकाला कचरा प्रकल्प तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टींग व सौर उर्जा प्रकल्प राबविणे बंधनकारक करून बांधकामाला परवानगी देण्यात आलेली असते. नविन बांधकाम इमारती उभ्या करण्यासाठी विकसक प्रकल्प राबवतो असे कागदोपत्री दाखवतात पण प्रत्यक्षात तपासणी केली असता काही विकसक कोणतेही प्रकल्प राबवत नाहीत असे दिसून आले. १५ नविन सोसायटीमध्ये जाऊन संबंधीत विकसक व चेअरमन, सेक्रेटरी यांना भेटून प्रकल्प चालू करणे विषयीच्या सुचना देऊन त्यांच्यावर प्रत्येकी १०००/– रुपये असे एकूण १५,०००/- रुपये शुल्क वसूल करण्यात आले.



पथकातील आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड व आण्णा ढावरे या पथकांनी कचर्याच्या पिशवीत हात घालून कोणाचा फोन नंबर, वीजबील, या आधारे पत्त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी जाऊन ३५ नागरिकांवर . कारवाई करून दंड ठोठावला.


