कोथरूडमध्ये कोयता गँगच्या दहशतीचा नाहक फटका सफाई कामगारांना ; पोलिसांच्या तत्परतेेचा आला प्रत्यय..
पुणे : पुणे शहरात कोयता गँगमुळे निर्माण झालेली दहशत मोडून काढण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर होते. पोलिसांनी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोयता गँग व त्यांची दहशत संपवण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात कुठेही कोयता गँगमुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सजग असून त्याचा प्रत्यय कोथरूड मधील एका घटनेतून पुढे आला.
कोथरूड – बावधन क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत डहाणूकर कॉलनी आरोग्य कोठीवर घडलेल्या प्रसंगावरून कोयता गँगच्या बाबतीत पोलीसांच्या चाणाक्ष कामगिरीचा प्रत्यय आला आहे. पण त्यांच्या कामगिरीचा दोन सफाई कामगारांना नाहक रोषाला बळी पडण्याची वेळ आली. त्यात पोलीस अधिकाऱ्यांचीही चूक नाही आणि दोन सफाई कामगांराची काही चूक नाही. दोघांनीही आपले कर्तव्य बजावले आहे.
घडलेला प्रकार असा की, मोकादम वैजीनाथ गायकवाड यांना माजी नगरसेवक शाम देशपांडे यांची डहाणूकर कॉलनीतील रस्ता क्रं. १८ वरील स्व. रामदासजी कळसकर पथ यांच्या नामफलकासमोर एक झुडूप वाढून ते नाव झाकले आहे तेवढे वाढलेले झुडूप व गवत तोडून नाव दिसेल असे सफाई करून घ्यावी” अशी तक्रार आली. सदरच्या तक्रारीवरून दोन सफाई कामगांराना ती तक्रार दूर करण्यास सांगीतले. त्यामुळे सदर झुडूप तोडण्यासाठी त्या सेवकांना कोयता घेऊन जाण्यास सांगीतले, त्यानुसार त्यांनी आरोग्य कोठीतून कोयता हातात घेऊन त्यांच्या दुचाकीवरून तक्रारीच्या ठिकाणी जाऊन काम केले. पण त्यांच्या दुचाकीवरून कोयता घेऊन जाताना पाठीमागे बसलेल्या कामगाराने तो कोयता झाकून घेऊन न जाता उघड्यावर हातात धरून घेऊन गेल्याचे सी.सी. कॅमेऱ्यात फुटेजमध्ये दिसून आले. त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयातून सदर कोयता घेऊन गेल्याचा व्हि.डी.ओ. फुटेज आला आणि सदर आरोपीला पकडा असा आदेश अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश तटकरे यांना आला.
त्या आदेशान्वये पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, गुन्हे अन्वेषण विभागाचे आशिष राठोड व पोलीस कर्मचारी निशिकांत सावंत यांनी सदर फुटेज वरून मोकादम यांच्याशी संपर्क साधून तो व्हि.डी.ओ. फुटेज पाठवून चौकशी सुरु केली. सदर घटनेची माहिती समजताचे झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर व मोकादम वैजीनाथ गायकवाड हे अलंकार पोलीस स्टेशनमध्ये आले आणि तो फुटेज पाहून यांनी सदर तपास अधिकाऱ्यांना असे सांगितले की सदर कोयता घेऊन जाणारे कोयता गँगचे दहशत निर्माण करणारे आरोपी नसून ते महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत”. अशी माहिती दिली. कोयता घेऊन झुडूपाची सफाई करण्यासाठी गेलेल्या दोघांना ओळखीची चौकशी करण्यासाठी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले, त्यामुळे सदर सेवकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
पोलिसांच्या पालिका प्रशासन कर्मचाऱ्यांना सूचना
भीतीने घाबरून गेलेल्या सफाई कामगांराना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण व आशिष राठोड यांनी सफाई सेवकांना तुमचे काम करण्याचे “कोयते, कु-हाडी, गवत काढण्यासाठी वापरात असलेले सामान उघड्यावर घेऊन जाऊ नका अशा सूचना दिल्या. तसेच महानगरपालिकेने अशा हत्यारांची नोंद त्या त्या पोलीस स्टेशनला द्यावी आणि सदर हत्याराने केलेल्या कामाची नोंद व छायाचित्रे काढून ठेवावी. तसेच सदर कामे करत असताना सफाई कामगारांनी आपला गणवेश व ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे शिवाय सफाई कामगांराच्या कामाचे कौतुक करून शाब्बासकीही दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना
सदर घटनेची माहिती घनकचरा व्यवस्थापन उपयुक्त संदीप उपायुक्त यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी असे आदेश दिले आहेत की,” सर्व महापालिका सहाय्यक आयुक्तांनी कायम व कंत्राटी सेवकांना गणवेश व ओळखपत्र परिधान करण्याच्या सुचना द्या, अन्यथा सक्त दंडात्मक कारवाई करा. महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे व आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे यांनी याबाबत,” वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश तटकरे यांच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले जाईल शिवाय कामावर असताना सफाई कामगांरानी गणवेश व ओळखपत्र परिधान करण्याच्या सुचनाही दिल्या. तसेच कंत्राटी कामगांराना देखील संबधीत ठेकेदारांनी ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत.