जेईई, नीटच्या विद्यार्थ्यांना सात महिन्यांपासून पुस्तक, टॅब मिळेना!

पुणे : ‘जेईई’ आणि ‘नीट’च्या परीक्षांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेणाऱ्या ओबीसी, व्हीजे-एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना गेल्या सात महिन्यांपासून पुस्तके, टॅब मिळाले नसल्याने महाज्योती या प्रशिक्षणावर खर्च करीत असलेला कोटय़वधींचा निधी वाया जात आहे.
महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून ओबीसी, व्हीजे-एनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे. महाज्योतीला या वर्षी अर्थसंकल्पात २५० कोटी दिले आहेत. अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण गेल्या सात महिन्यांपासून सुरू झाले. हे विद्यार्थी आता इतत्ता बारावीत गेले आहेत. परंतु त्यांना पुस्तके, टॅब किंवा इंटरनेट यापैकी काहीही देण्यात आलेले नाही. हे विद्यार्थी सन २०२३ मध्ये ‘जेईई’, ‘नीट’ची परीक्षा देणार आहेत. राज्यातील ८९२२ विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे नि:शुल्क प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे.
खासगी कोचिंग क्लास ऑफलाइन प्रशिक्षण देत आहे. तर महाज्योती ऑनलाइन प्रशिक्षणाचा अट्टहास का करीत आहे, असा सवाल करीत प्रशिक्षणाचे साहित्य लवकरात लवकर विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सरचिटणीस सचिन राजुरकर यांनी केली आहे.
जेईई, नीटच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरू राहील. त्यांना या महिन्यात पुस्तके, टॅब देण्याची व्यवस्था केली जाईल, असे ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी सांगितले.