पुणे शहर

कोथरुड सांस्कृतिक महोत्सव म्हणजे रसिकांना सर्वोत्कृष्ट कलेची अनुभूती देणारा सोहळा.

पुणे : जशी पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते तशीच कोथरुड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून सर्वपरिचित आहे. याच कोथरुडमध्ये गेली अनेक वर्ष संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या कोथरुड सांस्कृतिक महोत्सवाने सांस्कृतिक क्षेत्रातील एक उंची गाठली आहे. हा महोत्सव म्हणजे कोथरूडकरांसाठी एक सांस्कृतिक सोहळाच असतो, कारण या सोहळ्यात अनेक नामवंत कलाकारांची कला त्यांना पाहिला तर मिळतेच पण त्या बरोबरच अभिनय आणि दिग्दर्शनाच्या कलेत यश मिळवलेल्या कलाकारांचा जीवनपट ही त्यांना इथे अनुभवायला मिळतो.

अमोल साबळे
Editor सिंहासन News

कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा या सोहळ्यात उचित सन्मान केला जातो. त्याबरोबरच या महोत्सवात विनोदी कार्यक्रमात उडणारे हास्याचे फवारे व  शास्त्रीय संगीताच्या मैफलीत गुंजनारे स्वर नक्कीच वर्षभर रसिक श्रोत्यांच्या मनात आनंद निर्माण करत असतात आणि म्हणूनच या महोत्सवाची या सोहळ्याची कोथरुडकर आतुरतेने वाट पाहत असतात.

कोरोना संकटामुळे दोन वर्ष कोथरुड करांना या महोत्सवाला मुकावे लागले होते. आता सगळे सुरळीत होत असताना कोथरुड सांस्कृतिक महोत्सव कधी होणार या प्रतीक्षेत कोथरूडकर होते. पण ही प्रतीक्षा आता संपली असून आजपासून म्हणजेच दि. १९ एप्रिल २०२२ पासून हा भव्यदिव्य कोथरुड सांस्कृतिक मोहत्सवाचा सोहळा रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे.

संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे मूळ कुस्ती या खेळात असेल तरी कलेच्या क्षेत्रातही त्यांचा असणारा व्यासंग मोठा असल्याचे ते आतापर्यंत घेत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सिद्ध झाले आहे. सुरवातीच्या काळात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना गणेश जयंती दिवशी त्यांच्या रामबाग कॉलनीतील साई मित्र मंडळाजवळ आयोजित करण्यात येणारे मराठी, हिंदी गीतांचे कार्यक्रम आजही रसिक विसरलेले नसतील हेही तेवढेच नक्की. तेव्हापासूनच कोथरुडकर रसिकांना काय हवे हे त्यांनी हेरले व संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देण्याचा त्यांचा प्रयत्न खऱ्या अर्थाने सुरू झाला.

आज दर्जेदार सांस्कृतिक महोत्सव काय असतो हे कोथरुड सांस्कृतिक मोहत्सवाच्या रूपाने पुणेकरांना अनुभवायला मिळाले आहे. त्यामुळेच कोथरूडकरांबरोबरच पुणे शहरातील विविध भागातील अस्सल रसिक श्रोते उपस्थित राहून या कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतात. विशेष म्हणजे कलाकारांनाही या सांस्कृतिक महोत्सवात आपला सहभाग असावा असे कायम वाटत असते व तशी कबुली अनेक दिग्गज कलाकारांनी या आगोदरही दिलेली आहे. यावरूनच या महोत्सवाने सांस्कृतिक क्षेत्रात एक आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे हे निश्चीत होते.

महेश कोठारे, अशोक सराफ, महेश मांजरेकर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा जीवनपट आतापर्यंत कोथरुड सांस्कृतिक महोत्सवाच्या रंगमंचावर उलगडला गेला आहे तर शास्त्रीय गायन व संगीत, तालवाद्य, अशा कार्यक्रमांनी हा रंगमंच बहरून जातो. स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर, युगनायक स्वामी विवेकानंद यांच्यावरील अविस्मरणीय महानाट्य याच रंगमंचावर रसिकांना अनुभवता आली आणि कायमस्वरूपी आपल्या मनात साठवून ठेवता आली.  अशा कार्यक्रमांमुळेच संस्कृती प्रतिष्ठानचा कोथरुड सांस्कृतिक महोत्सव आजपर्यंत रसिकांना सर्वोत्कृष्ट कलेची अनुभूती देणारा सोहळा ठरला आहे.

Img 20220418 wa0006

असा आहे यंदाचा कोथरुड सांस्कृतिक महोत्सव

यंदाचा कोथरुड सांस्कृतिक महोत्सव आजपासून म्हणजे दि. १९ ते शुक्रवार २२ एप्रिल २०२२ दरम्यान आयडियल कॉलनी मैदान येथे सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून रंगणार आहे.  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, याच दिवशी ज्येष्ठ गायक पं. शौनक अभिषेकी यांना ‘संस्कृती कलागौरव पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ चे कलाकार यावेळी आपली कला सादर करणार असून यात स्वप्नील जोशी, निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सारंग कारंडे, भारत गणेशपुरे व अन्य कलाकार सहभागी होणार आहेत.

दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी (दि. २० व दि. २१) गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत ‘लतादीदी एक स्मरणयात्रा’ या कार्यक्रमाद्वारे सुरांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून संपूर्ण प्रवासाच्या आठवणी व आठ दशकांतील लता मंगेशकर यांनी गायलेली व स्वरबद्ध केलेली मराठी गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. कार्यक्रमाचे सादरकर्ते  डॉ. सलील कुलकर्णी असून ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर, सावनी रवींद्र, विभावरी आपटे, शरयू दाते, अनिरुद्ध जोशी, प्राजक्ता जोशी-रानडे, प्रियांका बर्वे, प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आदी सहभागी होणार आहेत.

महोत्सवाचा समारोप शुक्रवारी (दि. २२) ‘तालब्रह्म’ या भारतीय शास्त्रीय गायन व वादनाच्या जुगलबंदीच्या अनोख्या आविष्काराने होणार आहे. यावेळी तालवाद्यांचे जादूगार उस्ताद तौफिक कुरेशी, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया, सतार वादक पुरबायान चॅटर्जी, ज्येष्ठ तबलावादक पं.रामदास पळसुले यांच्या कलांचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे.

Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220418 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये